[२१९] श्री.
राजश्री कोन्हेरपंत बावा गोसावी यांसी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री स्ने॥ बावजी रायजादे दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेलें पाहिजे. यानंतर आह्मी वाडीकडून आश्विन शुध्द षष्ठीस देवरास आलों. त्यास, तुह्मास कळावें यास्तव लिहिले आहें. तुमचा आमचा स्नेह पहिलेपासून. तुमचे वडील देखील चालवीत आले. या उपरी तुह्मीहि स्नेहाची वृध्दि करीत गेलें पाहिजे. अनमान न कीजे. सुज्ञाप्रती विशेष काय लिहावें ? कृपा निरंतर असों दीजे. हे विनंति. आमचा हेत आहे जे तुमची सेवा करावी. त्यास तुह्मी बहुत लोकांचा चालविता. कीर्ति लौकिकांत फारशी जाली आहे. तरी तुह्मी ते प्रांतीं आहां, आमचा रोजगाराचा विचार होऊन येईल ते गोष्टी करणें. अनमान न कीजे. हे विनंति.