[२१८] श्री.
राजश्री कोनेर राम गोसावी यांसी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत गेले पाहिजे. विशेष. राजश्री यशवंतराव थोरात हे आह्माबरोबर चाकरीस होते. त्यास, मशारनिलेनीं आह्माजवळ वचन प्रमाण केलें की आह्मी पुढें तुह्माजवळ राहून चाकरी करून देऊ. ऐसा करार केला. त्यावरून आह्मीं मशारनिलेस हत्ती दिल्हा. असें असोन शेवट आपले करारास अंतर करून, आह्मास न पुसतां रिघोन गेले. त्यांजकडे आमचे इजाफा रुपये ६०४० सहा हजार चाळीस आहेत. त्याची याददास्त अलाहिदा पाठविली आहे. तरी तुह्मीं याजकडोन हत्ती व सदर्हू रुपये तगादा करून घेणें. येविशी राजश्री त्रिंबकजी थोरात यासीहि पत्र लिहिले आहे. तरी सदर्हूचा निकाल करून घेणें. जाणिजे. छ १० माहे जमादिलाखर. बहुत काय लिहिणें. लोभ असू देणें. हे विनंति.