[२१६] श्री. ९ डिसेंबर १७६०.
पे॥ छ ३० रबिलाखर.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री. यशवंतराव कोन्हेर स्वामी गोसावी यांसी :-
पे॥ सदाशिव चिमणाजी नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. तुह्मी प्रस्तुत कोठें आहां? तुह्माबरोबर फौज काय आहे? व राजश्री बाबूराव कोन्हेर कोठें आहेत? व लक्ष्मण कोनेर कोठे आहेत? (तें कळविणें.) जाणिजे. र॥ छ ३० रबिलाखर सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.
[२१७] श्री. १७ जुलै १७४३.
राजश्री कोनेर राम मजमदार गोसावी यासी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य स्ने॥ रघाजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत विनंति उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लेखन केले पाहिजे. विशेष. आह्मी बंगालियाहून नागपुरास आलियावर सविस्तर वर्तमान लेहून पत्रे रवाना केलीं आहेत त्याजवरून कळों आलें असेल. त्यावर तुचें पत्र आले. व महाराज राजश्री यांची आज्ञापत्रें सादर जाली. तेथें आज्ञा की दर्शनास येणें. त्यास, आह्मी तत्समयींच स्वार होवयाचा विचार केला होता. परंतु, राजश्री भास्कराम यांस बंगालियांत ठेविले होतें त्यांचा मार्ग लक्षीत होतों. प्रस्तुत फौजेसहवर्तमान ज्यामार्गे पेशवे यांची फौज आली त्याच मार्गे एका दों मजलीचे अंतरें आले. त्यांची फौज माळव्यांतून आलियावर म॥निले मजल दरमजल शिवनीछपारेयावरून आह्मापाशीं आले. भेटी जाल्या. तुह्मास कळावें ह्मणून लिहिलें असें. याजउपरी गुंता नाहीं. मजलदरमजल राजश्री स्वामीचे शेवेसी येऊन पोहोंचतों. जाणिजे. र॥ छ ६ जमादिलाखर. याउपरी तत्प्रांतें सत्वरींच येत असो. बहुत काय लिहिणें. हे विनंती.
मोर्तबसूद.