[२१३] श्री.
श्रिया सहस्त्रायु चिरंजीव राजश्री अबा यासी प्रती रामचंद्र कोनेर आशीर्वाद उपरी येथील कुशल त॥ ज्येष्ठ बहुल पंचमी, मुक्काम श्रीकृष्णा दक्षिण तीर नजीक सौंजुति येथे समस्त स्वस्ति क्षेम जाणोन स्वकीय कुशल वर्तमान लिहीत जाणें. विशेष. सांप्रत तुह्माकडून पत्र येऊन वर्तमान कळत नाही, येणेकडून चित्त सापेक्षित असे. तरी हरघडी कुशल वर्तमान लिहोन संतोषवीत असले पाहिजे. इकडील मजकूर तरी या पत्रापूर्वी सविस्तर लेहोन जिवाजी जासूद पाठविला आहे. त्याजवरून साद्यत कळो आले असेल. सांप्रत राजश्री पंत प्रधानासह वर्तमान श्रीकृष्णासंनिध आलों असो. नदीस पाणी बहुत. विचारे उतरोन पेशवे खुद्द पार जाले. कोणी उतरावे आहेत. आह्माकडील कोण्ही उतरले. कोण्ही उतरावे आहेत. झाडोन उतरल्यानंतर आह्माकडील मनसुबियाचा गुंता उरकोन अविलंबेंच येत असो. कारभाराचें तोंड पडिले आहे. ईश्वरइच्छेकडून उत्तमच होऊन येईल. काही चिंता न करणे. येथून आजी शुक्रवारी सप्तमीस प्रात:काळी श्रीकृष्णा उतरून उत्तर तीरास आलों. राजश्री पंतप्रधान कुडचीजवळ उतरले आहेत. आज आठ मुकाम यांचे उतरून आले, आमचे यजमान दक्षिण तीरी सौंजत्तीनजीक आहेत. चिरंजीव त्यांजवळ ठेविले आहेत. एक उंट, एक राहुटी ठेविली. सबब जे नदीस पाणी आलें. दुसरे, अर्धे लोक उतरले, अर्धे उरतात. तो आज पांच रोज सौ॥ दर्याबाईचें पोट दुखते. गरोदर आहेत. तारळ्यास एक थडीने रवाना केली, पालखीत बसावे तो हा उपद्रव पोटाचा जाला. याजवर राहिली. पेशव्यांनी चार पांच चिट्या यजमानास लि॥ जे राजश्री त्रिंबकजी राजे व राजश्री बाबूराव, कितेक बोलणे आहे, सत्वर प॥ त्याजवरून चार रोज से॥ दर्याबाईंची वाट पाहिली. अद्याप प्रसूत नाही. याजकरिता यजमानांनी पेशव्यांकडे प॥ तिकडे आजी कृष्णाबाई उतरून आलो. त्याजकडे जातो. बोलणे पेशव्यांचे व यजनांचे पूर्ववत् आहे. पेशवे उद्यां कूच करून मिरजेवरून मजल दरमजल पुण्यास येतील. यजमान बारा दिवस दक्षिण तीरास अडकले, ते, बायको अडली आहे. ईश्वर श्री रघुबिर निवाडा करतील तेव्हा, बारा दिवसांनंतर अलीकडे उत्तर तीरास येतील. दोही जीवांचा निवाडा श्रीनें सत्वर करावा. पुण्यास येणे प्राप्त झालेसे दिसतें. पेशवे दरकूच येतील. आह्मी त्यांचे लष्करांत आज जातों. यजमानाची काहीं खर्चाची बेगमी करून आह्मी पेशव्यांचे लष्करासमागमें तिकडे येतो. मोरोपंत दामले व गोविंदभट काका व विश्वनाथ गणेश यांस सत्वर सत्वर पुढे पे॥. राजश्री विश्वनाथ भटजीबावांस सांगणे जे सत्वर सत्वर येणें, ह्मणून सांगणे. बंगाल्याकडील ऐवजाविषयीं थोडीशी घालमेल आहे. सत्वर येणें, ह्मणून सांगणे. दोघा भावांचा मजकूर आजवर पूर्ववतच आहे. याप्रसंगी ते असावे. दुसरे, आह्मांस दरबारास जाणें प्राप्त. आमचे जाले आहे. तेही बोलावितील. विसोबांस सांगणे जे सत्वर सत्वर आले पाहिजे. खुद्द जाऊन सांगणे. वोढे याचें धरण तयार रातचा दिवस करून करवणें. पलीकडील विहीर पंचगंगेची तयार करवणें. हौदासारखी करवणें. पांढरीवरील भोगांवची विहीर तयार करणें. कारखाने व तोड चालतीच असों देणें. शेंदोनशे तीनशें रुपये अधिक उणेकडे न पाहाणें. यजमानास आजी चार घटिका दिवसास कन्या जाहाली. ईश्वरें बरें निवडिले. चौदा मुकाम जाले. बहुत काय लिहिणे. हे आशीर्वाद. देवाची सेवा करवीत जाणें. हे आशीर्वाद.