[२११] श्री.
राजश्री कोनेरराम मजमदार गोसावी यांसी :-अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा. दंडवत विनंति उपरी. येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. राजश्री बाबूराव प्रविष्ट जालेवरचे वृत्त लेखन करून पत्रें जासुदासमागमें पाठविली, ती प्रविष्ट होऊन लेखनार्थ सविस्तर श्रवण जाहाला. कर्नाटकचे मामलेयाचा अद्याप एकही निर्णय जाला नाही. त्यास हा काळ यन्नास अंतर जालें नाहीं. पुढे यत्नांत राहून कार्य करून घेत असो. ह्मणोन तपशिले लिहिले, कळो आले. व वेदमूर्ति श्री रघुनाथभट पटवर्धन राजश्री स्वामीचे सन्निध येऊन कितेक गोष्टीचे उपक्रम करणार होते. परंतु स्वामींची अनास्था देखोन भटजींचा हर्ष मंद जाहाला. कदाचित पुढे उपक्रम करावयाचा भटजींचे चित्तांत असिला तरी प्रसंगी परिमार्जन करावयासी अंतर होणार नाहीं. ह्मणोन लिहिले. ऐशियासी, भटजी कांही आपले यत्नास चुकणार नाही. येविशीचा अर्थ सविस्तर पूर्वी लिहिला आहे. घडी घडी ल्याहावें ऐसे नाही. प्रसंगी सावधच राहणें. सूचनार्थ लिहिले.
[२१२] श्री. ६ मार्च १७६१.
राजश्रियाविराजितराजन्यराजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणे. विशेष. नवरी चिरंजीव राजश्री नानांनी तुह्माकडे झांशीस पाठविली आहे. ते तुह्मी हुजूर याल तेव्हा बरोबर घेऊन येणें. किंवा बदरका देऊन हुजूर पाऊन देणे. जाणिजे. छ २८ रजब, सु॥ इहिदे सितैन मया व अलफ. बहुत काय लिहिणे. हे विनंति.