[२१०] श्री. २१ दिसेंबर १७६०.
राजश्रियाविराजितराजमान्यराजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यासी :-
पोष्य बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहीत जाणे. विशेष. चिरंजीव राजश्री भाऊसाहेबांचे पत्र छ ५ रबिलाखर पानपतच्या मुक्कामीचे आले की, आपली व अबदालीची सन्निधता जाली. दोकोसांची तफावत राहिली आहे. रोज लहान लहान झुंजे होतात. ऐशियास, फौज मातब्बर, समीपता जाली असता खबर न यावयास कारण काय ? युध्द जाहाले किंवा सलूख जाहाला, काय मजकूर जाहाला ? अलीकडे वर्तमान तहकीक आले असिले तर पत्रदर्शनी लिहिणे. राजश्री नारोशंकर यांस पत्र पाठविले असे. ते दिलीस रवाना करून उत्तर पाठवणें. खासा स्वारी हिंदुस्थानास येते. राक्षसभुवनावर मुक्काम आहे. दरमजल हिंदुस्थानास येतों. चिरंजीव राजश्री दादा निजामअल्लीस आणावयास गेले आहेत. दिल्लीकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. जाणिजे. छ १२ जमादिलावल. बहुत काय लिहिणे. हे विनंति.