[२०५] श्री.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पो॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहीत जाणें. विशेष. चिरंजीव राजश्री भाऊकडील लढाई बिघडली. हे खबर येऊन रांगडे लबाडी करावयास चुकणार नाहींत. तरी तुह्मी किल्ले झांशी वगैरे जागांची खबरदार मजबुदीनें उत्तम प्रकारें करणें. वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. खासा स्वारी सिहोरास आली.
[२०६] श्री. २४ फेब्रुवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर यांसी :-
पे॥ बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत असले पाहिजे. विशेष. तुह्मी वर्तमान विस्तारें लिहिलें तें कळलें. तपशीलवार मजकूर लिहिला तो यथार्थ. परंतु प्रस्तुत फौजांनी गिलज्यांवर जाऊन जोर करणें कळतच आहे! आपले जागे मुलूख राखावें, जमीदारांचे पारिपत्य करावें, याजकरितां ग्वालेरीस राजश्री बाबूजी नाईक व शहाजी सुपेकर व सदाशिव रामचंद्र व त्र्यंबकराव शिवदेव पाठविले आहेत. पावले असतील. सरदार सर्व बंदोबस्त करितील. तुह्मी तिकडील वर्तमान वरचेवर लिहीत जाणें. जाणिजे. छ १८ रजब, सु॥ इहिदे सितैन मया अलफ. बहुत काय लिहिणें. हे विनंति.