[२०१] श्री. २३ फेब्रुवारी १७६१.
राजश्रियाविराजितराजमान्य राजश्री बाबूराव कोनेर स्वामी गोसावी यांसी :-
बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत जाणें. विशेष. तुह्मी चंद्र ७ रज्जबेचें विनंतिपत्र पाठविले ते चंद्र १७ मिनहूस पावलें. श्रीमत् राजश्री भाऊसाहेब यांची व गिलजांची लढाई जाली. आपल्या फौजा निघाल्या. श्रीमत् भाऊ व जनकोजी शिंदे अजमरीकडे आहेत व मल्हारजी होळकर व नाना पुरंदरे व आणीक सरदार भिंडेवरी आहेत. या प्रांतात रांगड्यांनी मोठी धुंद मांडिली आहे. लोकांनी धीर सोडिले. ठाणींठुणीं रहावयाचें संकट आहे. जागाजागा ठाणियांस रांगड्यांनी मोर्चे लाविले आहेत. याजकरितां स्वामीचें आगमन होऊन बंदोबस्त जाहला तरी ठाणीं राहतील, नक्ष होईल, यवनहि बहुत हलाकेंत आला आहे, ह्मणून लिहिले. ऐशियास, आह्मी जलद येतच आहोत. ठाणीठुणीं राखणें. जाणिजे. छ १७ रज्जब. बहुत काय लिहिणे. हे विनंति.