[१६९] श्री . २८ ऑक्टोबर १७४०.
आज्ञापत्र समस्त राजकार्यधुरंधरविश्वासनिधि राजमान्य राजश्री बाळाजी पंडित प्रधान तहा मोकदमानी मौजे रेटवडी तालुके खेड, प्रांत जुन्नर, सुहुरसन इहिदे अर्बैन मया व अलफ. राजश्री बापूजी बाजीराव यांचे तीर्थरूप बाजी भीवराव, पुरातन राज्यांतील सेवक, एकनिष्ठपणें सेवा करीत आले. हालीं फिरंग्याचे मसलतेस तारापूरचे येलगरसमयी युध्दांत सरकार कामास आले. यास्तव, याजवरी कृपाळू होऊन मौजे मजकूरची मोंगलाई, बाबती, चौथाई, सरदेशमुखी व साहोत्रा देखील इनाम यासी व यांचे पुत्रपौत्रादिवंशपरंपरेने दिला असे. तरी इनाम अनभवतील या पत्राची प्रत लेहून घेऊन अस्सलपत्र मशारनिलेस परतोन देणें. प्रतिवर्षी नूतनपत्राचा आक्षेप न करणें. छ १७ साबान. आज्ञा प्रमाण.