[१६७] अ श्री . ११ जानेवारी १७३९.
गंगाजान्हवीसमान मातुश्री वेणूबाई काकी वडिलांचे सेवेसी :-
अपत्ये बाजीराव बल्लाळ साष्टांग नमस्कार वि॥ येथील त॥ पौष वद्य १३ पावेतों स्वकीय लिहीत जाणें. विशेष. पौष शु॥ ११ स तारापुरावर हल्ला केला ते समयीं बाजी भिंवराव तोंडात गोळी लागून कैलासवासी जाहाले. ईश्वरें मोठें अनुचित केले ! तुह्मास मोठा शोक प्राप्त जाला. आमचा तर भाऊ गेला. त्यास, तुह्मी वडील. दु:खाचें परिमार्जन करून विवेक करावा. त्यांची मुलें व चिमणाजी अप्पा आहेत, त्यांचेहि त्याजपेक्षां अधिक चालेल. परंतु आमचा भाऊ गेला. बाजू गेली. उपाय नाहीं. त्यास, चिमणाजी भिंवराव हे पाठविले आहेत. हें सांगतील तें ऐकावें. सारांश, मीच तुमचा बाजीराव असा विवेक करून धीर धरावा. मजवर दृष्टी द्यावी. बहुत काय लिहिणे. लोभ कीजे हे विनंति.
[१६८] श्री . ११ जानेवारी १७३९.
राजश्रिया विराजित राजमान्यराजश्री चिमणाजी भिंवराव स्वामीचे सेवेसी :-
पोष्य चिमणाजी बल्लाळ नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहीत जाणें. विशेष. राजश्री बाजीराव यांस देवाज्ञा जाहाली. त्यांचा परिणाम उत्तम प्रकारें ह्मणावा तैसा जाहाला. बाजीराव लौकिकानें गेला. आमची बाजू गेली या गोष्टीनें श्रम जाहाले. त्याचा विस्तार लिहिता फार आहे ! पत्रीं कोठवर लिहावा ? मातुश्री वेणुबाई काकीस वृध्दापकाळी महदु:ख जाहाले ! होणार बलवत्तर ! ईश्वरइच्छेस उपाय नाहीं ! ती॥ मातुश्रीचें समाधान करून परिमार्जन करावें. सारांश, विवेके करून दु:खाचा परिहार केला तरच होईल, अन्यथा होणार नाही. मातुश्री वडील आहेत. सर्वांचे समाधान करणे युक्त असे. वरकड गेली गोष्ट येतीशी नाहीं. चिरंजीव र॥ बापूजीराव व गंगोबा हे उभयता आह्माजवळ सुखरूप आहेत. त्यांचेविशी आपले समाधान असो देणें. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे विनंति.