Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

पिलाजी गायकवाड याचा ज्येष्ठ पुत्र संभाजी गायकवाड कामास आला. समागमें पागा हुजरात होती. ती कामास आली. लेकवळे कामास आले. शिलेदार पथकें होती ती फितूर होऊन पेशवे मिळाली. पाणी पाजावयाचे मिसे चाळीस हजार फौज पळून गेली. उदाजी पवार मात्र कामास आले. सायंकाळ जाल्यावर नंतर पेशवे यांचे फौजेनें हत्ती सहा घटका रात्रीस मुडद्यासुध्दा लष्करात नेला. नंतर हे वर्तमान मागें यशवंतराव सेनाखासखेल यांसी सांडणीस्वार लढाई सुरू जाल्यावर रवाना जाला होता तो पोहोचल्यावर, कळले. ते फौजेनिशी तयार होऊन चढोन गेले. त्यांनी युद्धप्रसंग करून मुडदा व निशाणे वगैरे नेहली होतीं ती आणून, त्रिंबकराव सेनापति यांस अग्न देऊन, तैसेच पंतप्रधान यांचे मागें लागले. पेशवे पुढें पळो लागले. ते पुढे, हे मागें कूच दरकूच सातारियास दाखल जाले. बाजीराव पेशवे राजवाडयात जनानखान्यात लपोन राहिले आहेत व यशवंतराव सेनाखासखेल व सवाईबाबूराव दाभाडे मागें लागले आहेत. त्याजवरून राजश्री शाहू महाराज किल्ल्याचे दरवाजापाशी येऊन उभे राहिले. सेनाखासखेल व बाबूराव आले. त्यांस राजश्री यांणी आज्ञा केली की, तुह्मी माझा गळा कापून ब्राह्मणास मारणे, मी अपराधी आहे. ऐसे उत्तर महाराजांचे ऐकोन उभयतां बंधू कूच करोन रुसोन तळेगावी आले. मागे राजश्री तयारी करून समजाविशीकरिता तळेगावास आले. बोलण्या-चालण्याची तोड पडोन, राजश्रीस मेजवानी सवाई यांचे वाड्यात केली. तेथे मोहरांचा व रुपयांचा चौतरा करून वर राजश्रीस बसविले. ते समयीं राजश्रींनी गळयात पडदाळे व तरवार घालून, बाजीराव यास हातीं धरून, उमाबाईस बोलावून आणोन, पडदाळयांतील तरवार काढोन, बाईपुढे ठेवली, व बाजीराव याजला पायावर घातले, आणि बोलले कीं, तूं आपले हातें याचा गळा काप. नंतर समजूत पडली. परस्परे बहुमान दिल्हे. नंतर राजश्री यांणी कृपा करोन यशवंत दाभाडे यांस सेनापतीचं पद दिधले व सवाई बाबूराव दाभाडे यांस सेनाखासखेलचें पद दिधले. नंतर महाराज सातारियास गेले.