[१६६] श्री.
हकीगत : आपले वडील मल्हार गोविंद व विनायक नारायण व गणेश नारायण धडफळे, वास्तव्य कसबे पुणे यांचे वेळेस श्रीमंत राजश्री बाजीराव बल्लाळ प्रधान पेशवे यांस मौजे हिंगणगांव त॥ सांडस प्र॥ पुणे येथे दजी थोरात, पुंड, मवाशी, गढी बांधोन राहात होता, त्यानें तीस कोस धावणे करून, छापा घालून, श्रीमंत पेशवे यांस व अंबाजीपंत पुरंदरे यांस धरून, हिंगणगावचे गढीमध्ये नेऊन अटकेस ठेविले. तजदी बहुत केली. तेवेळेस आपले वडील त्रिवर्ग यांणीं बहुत कष्ट मेहनत करून श्रीमंतांस मंडळीसुध्दा गढीबाहेर काढून अटकेंतून मोकळे केले. मग श्रीमंत आपले फौजेत जाऊन जमाव करून राहिले. नंतर श्रीमंत बाळाजी विश्वनाथ प्रधान कैलासवासी, यांणी सैदाची कुमक मदतीस आणून, तोफांसह वर्तमान हिंगणगावावर जाऊन, दमाजी थोरात व त्याचा कारभारी येसमाळी बोरीकर यांस धरून कैद केले. बेडया घालून किल्ले पुरंदरास ठेविले. गढी पाडून नदीत टाकिली. हिंगणगावच्या पांढरीवर खराचा नांगर फिरविला. पुढे श्रीमंत पुण्यास आले तेव्हा धडफळे मशारनिल्हे यांचे वाडयांत येऊन राहिले. धडफळयावर मेहेरबानी श्रीमंतांची बहुत, यामुळें अडीच तीन वर्षे पुण्यांत आले ह्मणजे धडफळयाचे घरी राहावें. नंतर बाजीराव यांणी खाजगत वाडा पुण्यांत बांधावयास जागा शेक सादात पीरयाचे दक्षिणेस घेऊन त्या जाग्यावर नऊ बुरुजी वाडा, मोठा कुसूं घालून बांधिला. मग तेथे राहूं लागले. धडफळे बहुत प्रकारें सरकार कामकाजास पडले, सबब श्रीमंत बाजीराव पेशवे कृपावत होऊन, धडफळयास इनाम जमीन वंशपरंपरा देऊन इनामपत्रे करून दिल्ही.