[१६५] श्री. १२ जानेवारी १७५१.
आशीर्वाद उपरी. श्रीमंताची दोन जोडी आह्माकडे आली कीं तुह्मांकडे ऐवज अखेर साल त॥ आठ नवलाख रुपये राहतात, त्यास, तूर्त राजेहि मातुश्री ताराबाईनें अटकाविले, दाभाडियासीहि स्नेह ठीक आला नाहीं. फौज तो धरली पाहिजे. फौजेचे समाजाविशीस पांच सात लाख रुपये कमी आले, त्यास तुह्मी यासमयीं ऐवजाची मदत करणें, ह्मणून आज्ञा आली. त्यास खावंदांनीं दोन जोडी पाठविली. दोनवेळ तेंच लिहिले. त्यास कांहीं न दिल्हें तर कार्यास न ये. आमचा सर्वांचा विचार ह्मणावा तर सालगु॥ बाकी तिसरा हिस्सा राहिला. हालसाल मिळोन निमे साल जालें. परंतु सवंगाईमुळे पैसा वसूल होत नाहीं. रयत बटाई घ्या ह्मणते; नाहीं तर पळोन जातात. पैसा उगवत नाहीं. याप्रकारें येथील फजिती आहे. कांही लिहिता पुरवत नाहीं. बुंदेलखंडी चार लाख रुपये कर्ज देणें ते अद्याप वारत नाहीं. शहरी देणें तें तसेच. श्री काशीमध्यें हुंडी केली. तेथे ऐवज तूर्त न मिळे. तेव्हा तेथे कर्ज घेणे लागले. असा प्रसंग ईश्वरे पाडिला. परंतु केवळ हौष. खावंदास लिहिले तर तेही श्रमी होतील. याजकरितां येणे प्र॥ तूर्त तजविजेने श्रीमंतास विनंति करून हें वर्तमान सर्व विदित करून येणेप्रमाणें ठहरावणें.
उदमी, कापडकरी यांची वरात केली. साठ बासष्ट हजारांत कबूल करणे. ते रुपये देणें. ऐवज लाऊन, पाठवून दिल्हाच आहे. कलम १. |
सरकारी दोन लाख रुपये तूर्त मागतात. त्यास, लाख रुपये तूर्त कबूल करणे. त्याजपैकी तुह्मांजवळ ऐवज असेल तो देणे. बाकी भरीस ऐवज शहरी जोशीबावा पासून घेऊन जाणे. तूर्त दरबारचा विचार राखणे. १. |
आजी दोन महिने दरबारचे वर्तमान कळत नाही. तर ऐसे करीत न जाणे. वरचेवर वर्तमान लिहीत जाणे. सातारा मातोश्री ताराबाईंनी फितूर केला. राजे किल्लेयावर नेले. त्यास, पुढें ताराबाई काय करितात? व श्रीमंतांनी काय केले? यमाजीपंत श्रीमंतांकडे आला किंवा मातोश्री ताराबाईंकडे गेला ? ताराबाईंचे फितुरांत कोण कोण आहेत ? तें सविस्तर लिहिणें. सारांश, वर्तमान पंधरा रोजांचे पंधरा रोजांत वर्तमान लिहीत जाणे. |
येथे धरणींपारणीं सावकाराचीं होऊ लागली. अशी गत कधीं न जाली. येथील आह्मी हरकसें संभाळूं. परंतु श्रीमंतांनीं लिहिले त्यास उपाय नाही, याजकरिता लाख रुपये कबूल करून देणे. १. सातारा मातोश्रींनीं गडबड केली. त्यास, श्रीमंतांनी त्यांची विचारणा काय केली? ते लिहिणे. १. |
मित्ती माघ वद्य ११. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.