[१६१] श्री. १ आगस्ट १७५१.
विनंति उपरी. पत्रें पाठविली ती पावलीं. लिहिलें वर्तमान साद्यंत कळले. आजी तीन महिने सागरी येऊन जालें, आपणांस तीन पत्रें पाठविली; परंतु एकही पत्राचें उत्तर न पाठविलें, ह्मणून लिहिले. जी पत्रें तुमची आली त्यांचे जबाब चिरंजीव काशिबाजवळ पाठविले आहेत. त्यांनीं तुह्मांस पावते केले असतील. इकडील कामकाज, दहाबारा गढी घेतली. यमुने पलीकडे भरताळे ह्मणून मातब्बर गढी होती, तिजलाही मोर्चे लाऊन, नांवावरोन उतरोन, तेही फते जाली. तेथील बंदोबस्त करून उदईक येथून कूच होईल. येथून चहू कोशावर एक गढी आहे, ती घेवोन, देशीहून मीरखान, दादूखान, राणोजी जगदळे, बिंबाजी ह्मसे, भवानजी जाधव, तुकाजी कवडे, आले ते दोचोरोजांनीं आह्मांजवळ येतील, त्यांची आमची भेट झाली ह्मणजे त्यांजला येथे बंदोबस्तास जें ठेवणें तें ठेवून आह्मी सागरी येतों. तूर्त तुह्मी सागरी राहणें. आह्मी तेथें येतो. सर्वांचे हिशेब होणें ते घेऊन, तुह्मांस ज्या जागा ठेवणें ते तजवीज करून ठेवून. तिळमात्र फिकीर न करणें. सागरीच राहणे. सागरी येतों. दसरेयासी तीर्थरूपांची रवानगी देशास करून. तुह्मांस जेथे ठेवणें तेथे ठेवून. फिकीर न करणें. मित्ती भादो वद्य ६. इकडे जमीनदारांनी मोठी फजिती केली होती. परंतु, श्रीमंतांचे पुण्येकरून बारा वाटेस गेले. नक्षच जाला. मुलूखहि वसला. हे आशीर्वाद.
[१६२] श्री. १२ जानेवारी १७५१.
आशीर्वाद उपरी. श्रीमंतांनी कांही ऐवजांची निकड लावली आहे. त्यास, जरकरितां रदबदलीमुळे चार दिवस तकूब जाले, तर उत्तम जाले न जो, कांहीं देणेंच लागतें, तर लाखपावेतो देणेंच लागले तर कांहीं तुह्मांकडे असेल तो देणे. बापू शिदाप्पासुध्दा, वगैरे यात्रेकरूसुध्दां, बाकी भरतीस लागला ऐवज तर, जोशीबोवास पत्र लिहिलें आहे हें त्याजकडे पाठवून भरतीस ऐवज घेऊन येणें. जरकरितां तूर्त काम नसलें तर जोशीबावाकडे पत्र न पाठवणें. नाहीं तर व्याज वाढों लागेल. मित्ती माघ वद्य ११. शहरचें देणें पांच लाख जालें, येथें चार लाख, अशी वोढ जाली आहे. ऐवज निघत नाहीं. हुंडी वजिराचे कजियामुळें होत नाहीं. मित्ती. बहुत काय लिहिणें. हे आशीर्वाद.