[१६०] श्री. २ १५ मे १७५१.
पु॥ चिरंजीव राजश्री बाबूराव यासी आशीर्वाद. उपरि. याप्रमाणें परगणेयांचे वर्तमान. पंधरा वीस रोज सारे राहिले. बाकी सालगुदस्ताची होती ते तो पाटिलांस सोडून दिली. तेव्हां गावांवर आणून रब्बी काढविली. त्याजवर गल्ला स्वस्त, कोणी घेत नाहीं. गल्ले तैसेच आहेत. याजकरितां पैसा परगणेयात वसूल नाहीं. कर्जवाम, या प्रांतीं सावकारांशी सलूख होता, लाख दोन लाख समयीं मागितले; तर हुंडीपांडी मिळत होती, ते काम एकंदर राहिलें. एक रुपयाचें कार्य होत नाहीं. याजकरितां वरातदारांस ऐवज न पावला. त्यास, श्रीमंतांनीं दोन तीन जोडिया काशीद सावकारांचे रुपयेयाकरितां पाठविले. ते येऊन बसले. परंतु येथें इलाज नाहीं ! रोख रुपये घेऊन फिरले तरी हजार रुपयेयांची हुंडी घेत नाहीं. त्यास आमचा इलाज काय ? येथे बहुत इलाज केला, करीत आहों. परंतु सावकार ह्मणतात जे, आगरेयांत दुकानें सुचेताईनें बसतील. तेथून लिहिली सर्व जागा होतील, ह्मणजे हुंडीचीं कामें चालतील. त्यास आमचा इलाज काय ? दहा वीस हजार रोख वरात असती तर येथें देवितों, देतों. पुणेयांत रुपये दिल्हे पाहिजेत. हुंडीखेरीज कसा रुपया पावतो ? त्यास, तूर्त आह्मी तरतूद केली आहे. आगरे, छत्रपूर येथें माणसें पाठविली आहेत. त्यास, पठाणहि मारले गेले. याजउपरी सुचेताई होईल ह्मणजे हुंडी वरचेवर पाठवून देऊन. आह्मांस काळजी आहे. सारांश, पठाण मारिले न जाते, तरी आमचे अमल न राहते. जमीदार, पठाणसुध्दां, एक झाले होते. पठाणाचा मनसुबा पातशाही घ्यावयाचा होता. पातशाही हातांत न ये तर पातशाहास दबवून, वजिरास रून, वजीर, बक्षी व दिवाण आपण व्हावें. हा मनसुबा होता. श्रीगंगातीरीं बंदी बहुत केली, त्याचे फळ सध्यां पावला! असो. श्रीमंत राजश्री नानास्वामीचें पुण्य समर्थ आहे ! श्रीमंतांचे पुण्येकरून पठाणाचें यश आलें. नाहीं तर कांही लिहावेसें नव्हते ! तुरवाईवाला पठाणास मिळाला होता ! पाचशे स्वार, एक भाऊ, पठाणाकडे चाकर ! पंचवीस लक्ष रुपयेयाची जागीर पठाणापासून लिहून घेतली ! सिरोंज, सागर, त॥ भोवरासें, कुरवाई, व झाशी करारा, भदावर, कोचकनार, हे सर्व जागीर लिहून त्याणीं घेतली होती. आणि नित्य पठाणास सांगोन पाठवी कीं, ठाणें टाकोन जातात, हे देशी कुणबावा करितात, बाकीं सान आहेत, आषाढ जाला ह्मणजे हे देशास पळोन जातील, तुह्मी तिळमात्र फिकीर न करणें ! कागदपत्र सांपडलें. सारांश, इजतखानाचे जे स्वार त्या पठाणाकडे चाकर होते ते सर्व मारले गेले. लुटिले गेले. निदान फजीत जाला. असा बेइमान ! श्रीमंतांसहि लिहिले आहे. तुह्मीही साद्यंत सांगणे. येथें उभयतां सरदारहि त्याजवर इतराजच आहेत. वरकड किरकोळी जबाब लिहिलेत, त्यांचा जबाब आलाहिदा लिहिला आहे. चिरंजीव विसाजीपंत व चिरंजीव सो॥ बच्याबाई यांजला तूर्त पुणेयांस असो देणें. मार्ग सुबत्ता जालियावर माणसें येथून पाठवून, तेव्हां रवाना करणें. पुणेयांत त्यांजला रोख देणें, श्रीमंत र॥ महादाजीपंत बाबास, शिवजीपंत, धोंडोपंत, सखारामपंत यांसी पत्रें लिहिलें आहे. त्यांजला देणें. फर्मास त्यांची पाठविली त्याप्र॥ देणें. सोनेयाचे नग तयार जाले. मार्ग चालत नाहीं. सुबत्ता पाहोन रवाना करितों. देशी सुबत्ता जाली ह्मणजे पाठवितो. माणसे येतील ते नगही घेऊन येतील. बहुत दिवस नगास लागले. त्यास, दंगा इकडे. कारीगर न मिळे, याजकरितां लागले. तयार जाले. पाठवून देऊन. मित्ती ज्येष्ठ शु॥ १. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.