[१५९] श्री.
पु॥ जिरजीव र॥ बाबूराव यासी आशीर्वाद उपरी. श्रीमंत र॥ महादाजीपंत बाबासी तुह्मी उत्तमप्रकारें स्नेह राखणें. वरकड वर्तमान पंधरा रोजांनी लिहीत जाणें. आमची जोडी नसली तर जोशीबाबाकडे पत्रें पाठविणें. तेथून ते अजुरदार करून सागरीं पावतीं करितील. ईश्वरें मोठे संकट इकडेही प्राप्त केले होतें ! परंतु श्रीमंतांचे प्रतापेंकरून अरिष्टनिरसन होऊन बोलबाला जाला. मोठा नक्ष जाला ! पातशाही बुडालीशी जाली. याजउपरी धर धरून, पातशास धीर देऊन, जें जें कार्य पाहिजे तें केलियास होई असा समय आहे. वरचेवर तुह्मांस लिहीत जाऊन. पुणेयाची वरात जाली. असामीवार रूपये
३२०००० कित्ता वरात कापडकरी
५२००० कित्ता वरात तुह्मी प॥
------------------
३७२०००
२६००० विठ्ठलशिवदेऊ
-----------------
३९८०००
याजपैकी तूर्त लाख रुपयेयाची हुंडी अवरंगाबादेहून कर्ज घेऊन पाठविली आहे. त्यास थोडथोडा ऐवज देणे. तो आणीक मागाहून कांही ऐवज घेऊन पाठवितो. हुंडी येथे मिळत नाहीं. इलाज नाहीं. त्यास, सरकारी काशीद यथें आह्माजवळ आहेत. यमुना उतरून आलियावर त्याजला रवाना करून. हालीं जोशीबावाकडून लाख रुपये पाठविले आहेत. तजविजेनें थोडथोडे देणें. तो आषाढसीं आणीक ऐवज पाठवितो. तुह्मी कळेल तसें करून श्रीमंतासी विनंति करणें. श्रीमंत ह्मणतील कीं, ऐवज येणें, तुह्मी देत नाहीं. तर स्वामी ह्मणतात, ऐवज देणें खरा. परगणेयांत ऐवज एकंदर वसूल होत नाहीं. कर्ज हिंदुस्थानांत कजिया, यामुळें सावकारा बंद. इलाज काय करावा ? जर परगणेयांत चार दिवस न मिळाले तर कर्जवाम सावकारियांत मिळत होतें. त्यास, देशीं सावकारा बंद, आगरेयांत बंद, सर्वत्र बंद. इलाज काय करावा ? लाखों रुपये, सावकारियाखेरीज काय इलाज करावा ? रुपये घेऊन फिरलियास हुंडी न मिळे, असा प्रसंग आहे ! रुपये जे वरात जाली ते देऊन, परंतु चार दिवस मागें पुढे देऊन, ह्मणून बोलले. आह्मांस सत्वर लिहून पाठविणें. मोठा बखेडा ! सालगु॥ जमा जाली त्याची निम्मे जमा सालमजकुरीं हातास येत नाहीं. असो. प्रसंग सवंगाईनें जाला. आह्मी एकटेच नाहीं. सर्व माळवा वगैरे मामलेदारांची गत एकच आहे. तुह्मी वरचेवर वर्तमान लिहीत जाणें. पुणेयांत वस्तभाव, भाडेबिडे आहे, किल्लेयावर घर करून तेथें जतन ठेवणें. वारंवार काय लिहिणे? मित्ती ज्येष्ठ शुध्द २. बहुत काय लिहिणें. लोभ असो दीजे हे आशीर्वाद. केसोबा नाईक सरदेसाई व लक्षुण केशव यास पत्रें लिहिली, हें लक्षुमण केशव याजवळ देणें ह्मणजे तो त्यास प्रविष्ट करील. हे आशीर्वाद. चिरंजीव आप्पास आशीर्वाद. लिहिले परिसीजे. आपले कुशल वर्तमान लिहीत जाणें. लोभ असो दीजे, हे आशीर्वाद.