[१३१] श्री.
राजश्री चिमणाजीपंत व राजश्री धोंडोपंत व राजश्री बापूजीपंत गोसावी यांसी :-
अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य कृष्णाजी दाभाडे दंडवत विनंती उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लिहिलें पाहिजे. विशेष आपला प्रसंग आहे तो तुह्मांस लिहिला असतां महाराज श्री परमहंसस्वामीचे पत्रीं बहुत विषादें लिहिलें ऐसें उचित नाहीं. आह्मी स्वामीचे सेवक आहों. यथासामर्थे अंतराय न होय. तुह्मी कळेल ते सविस्तरें सांगणें. साता-यासी येतच आहों. दर्शन घेऊन भेटीनंतर सकल वृत्त विदित करून मग जे आज्ञा करितील ते प्रमाण असे. बहुत काय लिहिणें लोभ असो दीजे. हे विनंति.
[१३२] श्री.
श्रियासह चिरंजीव विजयीभव. मार्कंडीचे आयुष्य राजमान्य राजश्री बळवंतराव याशि प्रती बाजीराव यादव कृतानेक आशीर्वाद. उपरी येथील कुशल तागायत फाल्गुन वद्य त्रयोदशी पर्यंत यथास्थित जाणून स्वकीय लिहिणें विशेष. तुह्माकडील बहुत दिवस वृत्त नाहीं. तुह्मी पंचमीस येतों ह्मणून लिहिलें परंतु आलां नाहीं. तरी सविस्तर काय आहे, कधीं येणार तें लिहिणें. मल्हारी गायकवाड गेला तो अद्यापि आला नाहीं हेंही लिहिणें. तुह्माकरितां बहुत चिंता वाटते. येकवेळ भेटी घेऊन मग काय विचार करणें तो विचार करावा. हे विनंति. परंतु येकदा अगत्य येणें. बहुत काय लिहिणे. लोभ असो दीजे. हे आशीर्वाद.