[१२५] श्रीशंकर.
श्रीमत राजश्री बलवंतराव स्वामीचे सेवेशी. सेवक त्र्यंबक पर्वतराव सरदेशमुख प्रांत अक्कलकोट. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंती येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत असलें पाहिजे. विशेष आपणाकडून राजश्री कृष्णाजीपंत आले. पत्राच्या नकला पाहिल्या. आह्माकडून स्वामीच्या कार्यास अंतर कदापि होणार नाही. पूर्वीपासून वडिलांनी आमच्या वडिलांचा सांभाळ केला तदनुरूप आपण करित जावा. आह्मी कुटुंबातील आहों. अवांतर सर्व अर्थ पंत म॥निले लिहितील. आपण समर्थ आहो. कोणता प्रकार अगाध नाहीं. बहुत काय लिहिणें. कृपा चिरकाल असावी हे विनंति.
[१२६] श्री.
आज्ञा केली ऐसीजे. तुह्मी विनंती पत्र पाठविलें व राजश्री बलवंतराव आले त्यांणी हुजूर तुह्माकडील सर्व अर्थ येकनिष्ठेचे निवेदन केले, त्याजवरून कळलें. येथील लक्षाचे अन्वयें खंबीर तुमचा बळकट आहे. असो देणें. जाणिजे. चं॥ ११ रमजान बहुत काय लिहिणें.