[१२३] श्री. ३० अक्टोबर १७१७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४४ हेमलंबी संवत्सरे कार्तिक बहुल नवमी मंदवासरे क्षत्रिय कुळावंतास श्रीराजा शाहू छत्रपती यांनी मोकदमानी कसबें बावधन तालुके हवेली प्रांत वाई याशीं आज्ञा केली ऐसीजे :- भावगिरी गोसावी वास्तव्य डोंगरगड श्री कसबे म॥ हे बहुत थोर तपस्वी आहेत. यांचे चालविणें स्वामीस अवश्यक ह्मणोन यांस इनाम डोंगर कसबें म॥ पैकीं जमीन खालिसा पडप्रतीची बिघे १० दहा कुलबाव कुलकानू खेरीज हक्कदार याशी व शिष्यपरंपरेने इनाम दिला असें. तरी तुह्मी सदरहू जमीन डोंगरपैकी खालिसा असेल त्यापैकी पड जमीन दहा बिघे नोंदून चतु:सीमा करून इनाम शिष्यपरंपरेने चालविणे. प्रतिवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणें. याप्रत लेहोन घेऊन खुद्दपत्र भोगवटे याशी गोसावी म॥ पाशी परतून देणें. जाणिजे. लेखनालंकार मोर्तब सूद.
[१२४] श्री. (शांताश्रम) २३ मे १७२१
स्वस्तिश्री राज्याभिषेक शक्के ४७ प्लव संवत्सरे. वैशाख बहुल त्रयोदशीं भृगु वासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपती स्वामी यांनी देशमुख व देशपांडे प्रांत वाई यास आज्ञा केली ऐसीजे :- श्री संन्यासी याचे वृंदावन सोनगीरवाडी येथें कृष्णातीरीं आहे. तेथील पूजा, नैवेद्य, नंदादीप, अन्नछत्र व पुजारी याचा योगक्षेम चालविला पाहिजे. येविशी राजश्री यादव गोपाळ यांनीं विनंति केली, त्यावरून श्रीच्या वृंदावनास कसबे वाई स॥ हवेली प्रांत मजकूर येथे पडजमीन तीन प्रतीची चावर १ येक, दुतर्फा कुलबाब कुलकानू खेरीज करून हक्कदार करून इनाम दिला आहे. श्रीकडील पुजारी दुमाले करून इनाम चालविणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची पत्रलेखना घेऊन खुद्द पत्र भोगवटी यास या जवळ परतोन देणें. लेखनालंकार.