[११८] श्रीभार्गवराम.
श्रीमत् परमहंस स्वामी यांही चिरंजीव बापू व चिमणाजी व धोंडू यांशीं आज्ञा केली येशीजे. सभा शिंदे यांही साडेतीनशें वासे मोरणीवर टाकिले आहेत. तर धावडशीस तुह्मांजवळ लोक आहेत; व इकडून तिथे पाठविले. चार गांवची माणसें व गोठणें याचा कारखाना. ऐसे लावून मोरणीवरील वासे नेववणें, व इंदुलीस मागें आमचे लोकांही सातशे वांसे तोडिले तेही नेवणें. घरास पाया घालून बारेचे उत्तरे इमारतीची घरें बांधणे. नाहींतर तुह्मावर कोप होईल. ताम्राची धामधूम फार असली तर, बरें येकादे स्थल बांके पाहून तेथें तुह्मी राहणें, व वस्त तेथें आणणे. खंडू तुमचे हाताखालें आहे. आमचे नांवें पत्र लेहोन त्याजवळ श्रीचा प्रसाद नारळ २ देऊन त्याकडेस पाठऊन कौल आणवणें. डोंगरें तोडिली असतील, त्यांतून लांकूड बरें आणवणें. घरें इमारतीची उत्तम, पुढें मागें नांव राहेसारिखें काम करणें. नाहीतर कोप होईल. हे आज्ञा. जिन्नस पाठविला असे तपशील.
प्याला बाळास | डब्या | गूल |
१ | २ | ५ |
येणेंप्रमाणें भायाजी असगणकर याजबरोबर पाठविला असे. तो घेणे. हे आज्ञा.