[१०८] श्रीभार्गवराम.
श्रीमंत परमहंस स्वामी यांहीं चिरंजीव धोंडूस आज्ञा केली ऐशीजे :- चिमणाजीस तुह्मी दोहों भावें पाहिलें, ह्मणजे तुह्मांस अन्न न मिळे. जो चिमणाजी तोच आह्मीं आहों, असें जर लक्षिलें, चालविलें तरी तूं आणि बापूनें स्नेहानें चालोन उजूर न करावा. पुत्रापौत्रीं बरें होईल. जें काय लागेल तें सांगोन पाठवणें. गोठणें, माहाळुंगे यांचे दैव आईकलें, तसेंच आमचें आईकलें, तेव्हां तुला पाया वेगळे न करू. कोणी घालमेल करील तरी न आइकावी. असें लिहिलें तरी तुह्मी तिघेजण येका आईचे. यावर घालमेल कोणाची चालणार नाहीं. येणेंकरून तुमचा आब राहील, आणि तुमचें बरें होईल, हे आज्ञा. घालमेल केलियास त्रैलोक्यांत बरें होणार नाहीं. तुह्मी जे कागद पाठवले, ते दादास दाखवले होते कीं नवते ते लेहोन पाठविणें. हे आज्ञा.