[१०२] श्री. १७२८
चिरंजीव धोंडूस आज्ञा केली ऐसीजे :- तुह्मीं लिहिलें कीं गोसावी जावें. कर्मगतीनें दुष्टाची गांठ पडलियास फिरोन संकट स्वामीस ह्मणून लिहिले. तर आमच्या कुडींत आत्मा आहे तों तेथेंच करणें. तुमच्या मिरासा खाणोन कोणी नेत नाहीं ! श्री अनुकूल आहे तेव्हां आपले मिराशीस येऊन राहणें. जाणिजे. बहुत काय लिहिणें. आज्ञा. तुह्मी एके जातीचे लोक भाऊबंद असोन आपल्यामध्यें भांडू नये हें बरें नसे. या उपरि भांडलेत ह्मणजे आह्मीं देशांतरास जाऊं. तुह्मी शामळाचा घेऊन खुशाल कोकणांत येऊन रहाणें. पानभारे येता जे येतील ते येतील. आणीक लागतील ते विकत घेणें. थोडेसे तुह्मी चुकलेत. कारवीचे घट्ट वोंवण बांधोन त्यावर कौल घातले असतेत तर धुळी वारें याचें भय नवतें. काय तुमचे बुध्दीस पालट जाला ?
[१०३] श्रीभार्गवराम.. १७२८
श्रीमत्परमहंस स्वामी यांही
चिरंजीव बापूजी व चिमणाजी व धोंडू यांसी आज्ञा केली ऐसीजे : तुह्मी वरती गेलींत. कोकणची तुह्मास खंत लागली. तर त्या प्रांतांतून लौकर सुटका होऊ ऐसी अहर्निशिसी देवास प्रार्थना करतां. अशी तुह्मांस कां दुर्बुध्दि होते? पुढें येथील काय अवस्था ते काय ल्याहावी? याजकरितां देवें तुमची सुटका केली आहे. तिकडेच रहाणें. इकडील वर्तमान दिवसेंदिवस विशक आहे. याजकरितां मागें येईन ऐसी बुध्दी करावयासी प्रयोजन नाहीं. तुमचें इकडेच लक्ष! देणें घेणें असेल तें लेहोन पाठवणें. त्याची विल्हे करून४८. कळलें पाहिजे. तुह्मी तिघे आपले मुलांची आबाळ न करणें. जाणिजे बहुत काय लिहिणें हे आज्ञा.