[९८] श्री.
राजाश्रियाविराजित राजमान्य राजश्री मोरोपंत स्वामीचे सेवेशी. पे॥ बाबूराव कृष्ण स॥ नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल जाणोन स्वकीय कुशल लिहित जावें. विशेष तुह्मीं पत्र पाठविलें तें पावलें. प्रांत वांई येथील गांवगन्ना कारसाईचे रोखे श्रीमंत महाराज छत्रपती स्वामीची स्वारी खाली आली ह्मणून खाशा घोडयास कडबा झाडून गांवगन्नापैकीं आणावयाचे रोखे जाहले. केवळ वांई सुभाचे गांवची कारसाई घेतल्यावर पैका गांवास मजुरा द्यावा लागेल, ह्मणोन सरकारांत समजाऊन सनद पाठविली. परंतु त्यांत इतर गांवची कारसाई किल्याकडील रोखे करण्याची चाल नाहीं, असें लिहिलें आहे. त्यास हे कारसाई लोकांची नव्हे, महाराजाकडील आहे असें समजोन सनद आली नाहीं. असो. गांवगन्ना मसाले केले नाहीं. रोखे जाहले होते. त्यास हल्लीं राऊतही उठोन आले. तुह्माकडील गांव असतील त्यास तुह्मी लि॥वरून हाती चिट्या देविल्या. कारसाईचा पैका गांवास मजुरा द्यावयाजोगी कारसाई नाहीं. कुंभारकाम, पत्रावळी, कडब्याचे रोखे जाहले होते. त्यांपैकीं चवथाई तिजाई सामान आलें. शहरांत कडबा विकत न मिळे तेव्हां पाटलाचे समाधानें थोडा घेतला. मसाल्याची वार्ताच नाहीं. तुह्मी कल्पून लि॥ असो. सनद तुह्मीं पाठवावी असा अर्थ नव्हता. तुमचे पत्रानेंच बंदोबस्त होता. तत्राप तुह्मी उपर दाखविला असो. सनद शिरसा वंदिली. त॥ छ २३ जमादिलाखर बहुत काय लिहिणें. लोभ कीजे. हे विनंति.