[९७] श्रीभार्गवराम. १७२५.
श्रीसकलतीर्थस्वरूप बावा स्वामीचे सेवेशी.
चरणरज जिवबानें दोनीकर जोडून चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग नमस्कार. विज्ञापना ऐसीजे. स्वामीचें आज्ञापत्र आलें तेथें आज्ञा जे :- गांव मोठा, जमीन उदंड भरल्यास दोन हजार रुपये देई ऐसा, लिहोन पाठवणें. व स्वामीनें लिहिलें कीं माळशिरस आमच्या चित्तास येतें ह्मणऊन लिहिलें. तरी माळशिरस गांव मोठा आहे. वरकड गांव मोठे आहेत. हल्लीं दस्तास भारी आहेत. स्वामीचे आज्ञेवरून माळशिरसचे पाटील बोलावून आणिले होते. त्यांस चौकशी करून पुसलें. त्याणीं सांगितलें कीं, आमचे गांवची जमीन साठ पाउणशें चाहूर आहे. व मालकाचे वेळेचा दस्त तीन हजार रुपये आहेत. गांव बरा आहे. भरल्यास दो हजार रुपये देईसा आहे. गांव वाटे वेगळा आहे. गांवचा हल्लीं दस्त गुदस्ता साशें रुपये होते. सालमजकुरीं खंडणीस न्यावयास शिपाई आले होते. त्यांस आपला विचार कळलियावर एक खंडणी सात आठशें होते, ऐसें आहे. तर गुदस्ताची खंडणी हलकी आहे, हीच दिवाणांत सांगोन द्यावी, याकरितां स्वामीची आज्ञा येई, तवपावेतों पाटलांनीं तोंडे चुकाविली आहेत. स्वामीच्या चित्तांत घ्यावयाचा असिला तरी माळशिरसच्या पाटलास अभयपत्र पाठवणें कीं, आह्मीं गांव खामखा घेतो. असें अभयपत्र आलियानंतर चार दिवस खंडणीला दिरिंग लावितील व वसूलही हात राखून देतील. काय आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत, माळशिरसची पांढरी जबरदस्त आहे. त्याच्या तोलास जमिनीविशी कोण्ही गांव येत नाहीं. त्वरा जाहली तरी वसूल आपल्या हातास येईल. आठ पंधरा दिवस अवकाश असला तरी पाटिलास अभयपत्रें आलियानें वसुलास व खंडणीस आठ पांच दिवस हाताचे पायावर नेतील. वरकड स्वामीनीं शेरींत विहीर पाडावयाची आज्ञा केली. आज्ञेवरून विहीर पाडितों. इटा पाडावयास कुंभार आणिले आहेत, ते ह्मणतात जे : चवदा बोटें ईट लांब व रुंद बारा बोटें. तुह्मी आपले सामान द्याल तरी रुपयांनीं हजार देऊं. आणि आह्मास आपले सामान व दोन आयित्या इटाचें मान द्याल तरी हजारी रुपये पांच घेऊन. त्यास आपलें सामान द्यावें तरी त्याच्या हाताखाली माणसें द्यावी लागतात. व या प्रांतें फाटेही मिळत नाहीं. परंतु स्वामी ज्याप्रो। आज्ञा करितील त्याप्रो। वर्तणूक करीन. काय आज्ञा ते केली पाहिजे. यानंतर राजकी वर्तमान :- तरी राजश्री पंतप्रधान व नबाब यांच्या भेटी विसावे तारखेस वांजरेच्या कांठी जाल्ह्या. पहिले भेटीचे समई नबाबांनी रायास एक हत्ती व एक मोत्याची जोडी व घोडे दोन, सात परोचे वस्त्रें व एक पंजाब ह्मणऊन मुसलनी भाषेनें काय आहे तेंही दिल्हें. सेवेसी श्रुत होय हे विज्ञापना.