[९४] श्रीभार्गवराम. १३ सप्टेंबर १७४५
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री नाना स्वामीचे सेवेशी.
विनंति. पो॥ रामाजी गणेश मु॥ इमारत राजूर गणपति. कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति. येथील कुशल त॥ छ २७ माहे शाबान शुक्रवारपावेतों सकल वर्तमान कुशलरूप असे. विशेष. अंबाजी शंका याजब॥ पत्र पाठविलें तें पावोन लिहिलें वर्तमान कळों आलें. देऊंगाव अगर जालनापूर येथें सावकार मनास आणून ऐवज घेऊन पत्र पाठवणें, येथें ऐवज देऊं, ह्मणून लिहिलें. त्यास, सावकार लोक दोन चार हजार रुपये आमचे मातवरीवर नेदीत. त्याहीमध्यें श्रीचें वर्तमान या प्रांतीं बहुतांस कळलें. त्यामुळें लोक आह्मांस ह्मणतात कीं, तुमचा धनीं नाहीं, आणि आतां रुपये तुह्मांस द्यावें, मग मागावें कोणास? असें ह्मणतात. दोन चार हजार रुपये नेदीत. फार आमचे वोळखीनें तरी दोन चारशें मिळतील, त्याणें काय होणें आहे. हल्लीं वांटणी येत्ये ह्मणून लोक वाट पाहत होते. त्यास रुपये पाठविलेंत नाहीं, यामुळें लोक बहुत रंजीस आहेत. तजावजा होत होते; परंतु कांहीं उधार आणून थोडेंबहुत लोकांस देऊन काम चालवीत असो. हल्लीं सुलतानभाई पाठविलें आहेत. तरी याजब॥ चार माहीची वांटणी पाठविली पाहिजे. येथील काम कांहीं लौकर होत नाहीं. टाकून जावें तरी बदनक्ष होईल. या प्रांतीं कीर्ति जाहली आहे ते जात्ये. याजकरितां जाहलेंसे करणें लागतें. तरी काय स्वामीचे चित्तीं गोष्ट असेल ते जिव्हाळयाची सुलतानभाईजवळ सांगोन पाठवावी. तेणेप्रों वर्तणूक करून काम येथें कोण्या विचाराचें आहे तें सुलतानभाई विदित करील. तें आइकोन तेणेंप्रमाणें सरंजाम एकच वेळां दिल्हा ह्मणजे काम लौकर करून येतों. ध्वजेस इटा पाहिजेत. चुना कोळसे वाळू पाहिजे. त्यास हजार पावेतों रुपये लोणारियास पाहिजेत. त्याची ही तरतूद करून वांटणी बरोबर पाठवावें. इटा तयार जाहल्या पाहिजेत. संगीचें काम जाहलें ह्मणजे ईटबंदी काम चालवितों. उचापतिदार सावकार येथें केला आहे. पांचशे रुपयेपावेतों जिन्नस देतो. बट व लोखंड, गूळ, डिंक, काथ, ताग, ऐसे दोनशें रुपयाची उच्यापति आणून इमारतीचें कामें चालविलें. आजिपावेतों कोणे गोष्टीस अंतर पडो दिलें नाहीं. आतां वांटणीस स॥ जिन्नस, लोणारी व गाडेकरी याची बेगमी देणें. फाजिलावरून सत्वर पाठवावी. भक्षावयाकरितां लोकांहीं अवसान सोडिलें आहे. पाथरवट जात होते. त्यांस दीडशे रु॥ गांवचे वाणी याजपासून घेऊन असामीस दोन दोन रु॥ देऊन कामावर ठेविले आहेत. सत्वर वांटणी येत्ये तरी उत्तम आहे. नाहीं तरी आमचे विपत्य लोक करितील ह्मणून सुलतानभाई पाठविला आहे. तरी आधी तों रु॥ हुंडीनें पाठवावे. नाहीं तर धावडशीचीं पांच माणसें बरोबर देऊन थैल्या शिऊन वर लाखोटे करून राजुरा वेघें लखोटयास दरकार नाहीं अशी खरपूस ताकीद करून आपलीं तेथील माणसें पांच दि॥ देऊन रु॥ पाठविले पाहिजे. वरकड कापडापैकीं रु॥ पाठविलेत, त्यास साडेएकावन मात्र रोख प॥ ते आले. छत्तीस आले नाहींत. त्यास ताकीद करून पाठवावें. वरकड वर्तमान सुलतानभाई सांगतां विदित होईल. विशेष काय लिहिणें हें वि॥. ४७