[८७] श्रीभार्गवराम. २४ मे १७३४
श्रीमत् तीर्थस्वरूप श्रीपरमहंस परिव्राजकाचार्य स्वामीचे सेवेशी.
अपत्यें त्रिंबक कृष्ण मु॥ इमारत गोठणें. कृतानेक साष्टांग दंडवत प्राय नमस्कार विनंति. उपरी येथील कुशल ज्येष्ठ शुध्द तृतीया भृगुवासरपर्यंत स्वामीचे आशीर्वादेकरून कुशल असें.
विशेष. स्वामीकडेस जिन्नस व पत्र कोंडजी कदम याजबराबर पाठविली ते प्रविष्ट झालेच असतील. वरकड राजश्री संभाजी आंगरे यांणीं स्वामीस पत्रलखोटा पाठविला. तो लखमोजी याजबराबर रवाना केला आहे. उत्तर पाठविलें पाहिजे. वरकड राजश्री संभाजी आंगरे यांणीं बाइकांस पत्र लिहिलें कीं, आह्माजवळ कोणी शाहाणी माणूस जेवण खाण करी ऐशी नाहीं. याजकरितां मोबदला बटीक पाठविली आहे. हें घेऊन राहीस पाठवणें ह्मणोन लि॥ व बटीक पाठविली. त्याजवरी आह्मी व बाई कांहीं त्यास पत्र लिहिलें आहे कीं, तुह्मी बाइका श्रीचे सेवेसी दिल्या. त्यामधील राहीस न्यावी आणि मोबदला तुमची ठेवावी. येणें करून स्वामी काय ह्मणतील? हे गोष्टीस स्वामींची आज्ञा नाहीं. स्वामीची आज्ञा राहीस जाहली पाहिजे. गोवेंयास माणसें रवाना केलीं आहेत. सत्वरच येतील. तदुत्तर स्वामीकडे रवाना करितों. वरकड रु॥ पांच घणास द्यावयास आज्ञा केली. आज्ञेप्रमाणे रुपये दिल्हे. त्याणीं धावडकडेस दिल्हे. घण करावयास सांगितला. परंतु लौकर करून त्याणीं तुह्माकडेस रवाना करावा. तरी ते प्रस्तुत रानामध्यें पाठविले आहेत. याजकरितां स्वामीची आज्ञा होईल तर घण धावडाकडून आणवून आपल्या माणसाहातीं पाठवून. बहुत काय लिहिणें. हे विनंति.