[८२] श्री.
तीर्थस्वरूप दादा वडिलाचे सेवेशी.
अपत्यवत रामाजी व सुलतानभाई स॥ नमस्कार व अ॥ रामराम विनंति. उपरी आह्मीं हिशेबास धावडीस येत होतों. त्यास श्रीस्वामी या प्रांतीं येणार ह्मणून आइकिलें त्याजवरून राहिलों. वरकड वाघा मालुसरा याजकडील रु॥ घेऊन निरोप देणें ह्मणून तुमचें पत्र आलें, त्यावरून निरोप दिल्हा. हल्लीं काना आगरियाची आई आली, तिजबरोबर तुमचें पत्र आलें जें :- आगरियाबाबत रु॥ वाघाजवळून घेणें. त्यास वाघा गेला. हल्लीं श्रीस्वामी येथें येणार तेव्हां आह्मावर कोपास येऊन ह्मणतील जे ......... वाघा आणून हजीर करणें. त्यास वाघास तुमचे हुकुमावरून निरोप दिल्हा. बावाजवळ ऐसें सांगितलें ह्मणजे आह्मावर कोपतात. याजकरितां श्रीस्वामीस हें वर्तमान विदित जाहले असले तरी त्याची निशा करून आह्मावर शब्द न ये ते गोष्ट केली पाहिजे. नाहीं तरी श्रीस्वामी येथें येऊन अंतोजी शिबा याची गत करून आमची इजत दाहा लोकांत घेतील. ऐसें न कीजे. आह्मींच चुकलो असिलों तरी तुह्मीं धावडशीस नेऊन काय नशद करावयाची असेल ते केली पाहिजे. हुकुमाखेरीज वर्तणूक केली होईल तरी आह्मास काय शब्द लावाल तोखराच आहे. वाछा याणें आपले रु ॥ दिल्हे ते काना आगरियाची आई रुपये देईल. वरकड श्री स्वामी मनसुबी न आइकतां आह्मावर रागास येतील तरी त्यास अगोदर सांगोन आमचा अन्याय नाहीं कळलें पाहिजे. हिशेबास आह्मी यावें कीं न यावें, तें लिहोन पाठविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें हें विनंति.