[६२] श्री. २० जून १७०९
शिक्का शिक्का
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३६ विरोधी नाम संवत्सरे आषाढ बहुल अष्टमी इंदुवासरे, क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहू छत्रपति स्वामी याणी र॥ पिलाजी गोळे पदात सेनाधर याशी आज्ञा केली ऐसीजे : प्र॥ वांई येथील देशमुखीचें वतन दत्ताजी केशवजी नाईक व सूर्याजी बिन फिरंगोजी नाईक पि॥ याचे हरदूजणांनी निम्में निम्में प्रो अनुभवावें, असें असतां दत्ताजी केशवजी कथळा करूं लागला. त्यांस पूर्वी स्वामीनीं वर्तमान मनास आणून निम्में वतन सूर्याजी पि॥ याणें खावें, निम्में दत्ताजी पि॥ याणें खावें, ऐसें करून सूर्याजी पि॥ यांस पत्रें करून दिल्ही. त्याउपर अलीकडे दत्ताजी केशवजी याणें पुरंधरचे मु॥ हुजूर येऊन गैरवाका विदित करून सारे देशमुखीचीं पत्रें घेतलीं. ऐशियास प्रस्तुत सूर्यात्री पि॥ हुजूर आले. आपला करीना सांगितला. तो मनास आणून प्रांत मजकूरचे देशमुखीचें वतन निम्में यांस करार करून देऊन पत्रें दिल्ही आहेत. दत्ताजी केशवजी याणें सारे देशमुखीची पत्रें करून घेतली आहेत ती रद्द केली असत. आणि हल्ली सूर्याजी पिसाळ याचे दुमालें निम्में देशमुखीचें वतन केलें असे. तेणें प्रो हरदूजणें निम्में निम्में वतन अनुभवतील. तर जोरखोरें व जांबूळखोरें येथील मोकदस ताकीद करून हक्क लाजिमा निम्में वांटणी बरहुकूम बिलाकसूर देविलें आणि याचा अम्मल सुरळीत चाले ऐसें करणें. मौजे बोरगांव बु॥ तर्फ जोरखोरें, हा गांव सूर्याजी नाईक पि॥ यांस इनाम आहे तेणें प्रो करार करून देऊन सनद अलाहिदा सादर आहे, तेरें प्रो बिलाकसूर चालविणें दत्ताजी केशवजी यांस यांचे तक्षिमेस कथळा करूं न देणें. सदरहू बमोजीब महालीचे देहायकदीम वांईच्या देशमुखीखाली चालत असतील, तेथील हक्क, लाजिमा सालाबाद प्रो सालगु॥ प्रो चालविणें. इनाम गांव पेशजी चालला असेल, त्या प्रो दुमाला करणें. लेखनालंकार मुद्रा.
रुजू.
बार सुरू रुद्र बार.