[४६] श्री २ जानेवारी १७४९
पे॥ छ ११ सफ्फर सनातिसा.
राजश्रिया विराजीत राजन्य राजश्री जगंनाथपंत स्वामीचे सेवेशी.
पे॥ कृष्णाजी अनंत मु॥ माळशिरस सा॥ नमस्कार विनंति. त॥ पौष वद्य नवमीपर्यंत सुखरूप असो विशेष. येथील कुशल जाणून, स्वामीकडील अलीकडेस पत्रिका येऊन संतोषवीत नाहीं. तरी ऐसे न कीजे. सदैव आलिया माणुसाबरोबर पत्रिका प्रेशून संतोषवीत असिले पाहिजे. स्वामीनीं धारेच्या मुक्कामी पत्रें पाठविली ती पावोन संतोष जाहला. लिहिला मजकूर कळो आला. राजश्री यशवंतराव पवार यास पत्रें आपण पाठविलीं ती आह्मी मुजरत आह्माकडील शिलेदाराचा कारकून राजी मल्हार तळेगांवकर कुलकर्णी, हेजीब आह्मांपाशीं आहेत, त्यास पाठविला होता. त्यास यशवंतराव पवार कांही देहावर नाहींत. त्याचे किल्ले व परगणे श्रीमंतानी घेतले. वीतरागी होऊन रांडामध्ये आहों. रात्र असतां तेथें कागदपत्र अगर कोणी माणूस गेला, त्यास जाबसाल होत नाहीं, ह्मणून कारकून शहाणा पाठविला. त्याणें जाबसाल दिल्हा, जे आपणास सात लक्ष रुपये कर्ज आहे, ते आमचे पेशवे यांनी वारावें, तेव्हां तुमचे रुपये देऊं. नाहीं तर वरकड कर्जदारियांचे रुपये वारतील तैसे तुमचे देऊं. सातारे याजकडील आह्मांस भय दाखवाल तर आजच काय करणें असेल तें करणें. आपणापाशी रुपये नाहीत. श्रीमंत पंतप्रधान कर्जदारीयाची वाट करितील, तेव्हा तुमची होईल, ऐसा त्याचा जाबसाल जाहला. तुह्मांस कळावें ह्मणून लिहिलें असे. राजश्री लक्ष्मण शंकर याजकडेस असामी तुमची गुदस्ता सनद दिली ते असामी तुमची त्याजकडेस करार केली. राजश्री लक्ष्मणपंत याची आमची भेट तो जाहली नाहीं. आमची स्वारी जयनगर प्रांते जाहली, आणि राजश्री लक्ष्मणपंत नवा मुलूक यमुनातिरीं सोडविला, तिकडे गुदस्ता ते गेले ते अद्यापि तिकडेसच राहिले आहेत. त्याजवर आजी दोन भुमेयांचा दंगाच आहे, ह्मणून तिकडेसच राहिले आहेत. त्याजवर आह्मीं सुरंजेवर एक साल छावणी केली होती, त्याजपासून त्याचा आमचा स्नेह फारसा चालत आहे. वर्षाध्ये आमचे मनुष्याबरोबर त्यांची पत्रें आह्मांस येतच आहेत. आह्मी तुची सनद तेव्हाच पाठविली होती, व हल्ली आपली पत्रें लिहून दिली आणि जासूद जोडी १ मुजरद कालपीस यमुनातीरास त्याजकडेस ज्येष्ठ शुध्द प्रतिपदेस पाठविली. त्याच जोडीबरोबर गुदस्ताचे रुपये २०० दोनशे हिंदुस्थानी बिनदिकती श्रावणसीं धारेच्या मुक्कामी आणविले. हल्ली सालचे त्यास आह्मीं लिहिले. त्यांणी आह्मांस लिहिले जें :- हल्लीसालचे रुपये वैशाखमासी सुरंजेस आह्मी येऊं तेथें देऊं. श्रीची असामी आहे. श्रीच्या मागें आह्मांस त्यांचे सर्व साहित्य करणें लागते. ऐसे कितेक उपरोधिक गोष्टी त्यास आह्मी लिहिल्या. त्यांणी उत्तर पाठविलें जे :- लक्षप्रकारें श्रीचेमागें तुह्मांस साहित्य करणें लागतें त्याची फिकीर आह्मांस आहे. आह्मी अंतर करणार नाहीं. यंदाचेही सालचे रुपये येतील. फिकीर नाहीं; परंतु आह्मी घरास आलियावर आइकितों जे :- यंदाचें ताकीदपत्र तुह्मी श्रीमंतापासून घेऊन दुस-याचे स्वाधीन केलेत, ह्मणून आइकिलें. त्यास बहुत उत्तम गोष्ट केलीत; परंतु तुमची निशा असली ह्मणजे बरी. नाहीं तरी रुपया येणार नाहीं. अडीच महिने दोन जासूद मुजरद त्याजकडेस यमुना तीरास पाठविले आणि रुपये आणावे लागतात.