[४५] श्री ७ मे १७३४
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य विराजित भृगुनंदन स्वरूप बावा स्वामीचे सेवेशी. विनंति.
सेवक तानाजी नाईक चाळके नामजाद किले ससाळगड. कृतानेक विज्ञापना. त॥ छ १४ जिल्हेज सु॥ अर्बा सलासीन मया व अलफ पावेतों स्वामीचे कृपादृष्टीकरून किल्ल्याचें व सेवकाचें वर्तमान यथास्थित असें. याजवर स्वामीचें आज्ञापत्र सादर. तेथें आज्ञा कीं, संभाजी शिंदे याणी एकनिष्ठपणें सेवा केली. परंतु अल्पायु जाहले. तुह्मी ते जागी आला आहा. तर बहुत निष्ठा धरून आमचे काज काम करीत जाणें. ह्मणोन लिहिलें. तरी आह्मी सेवक एकनिष्ठ आहो. जैसे आह्मीं श्रीमंत राजश्री सरखेल साहेबाचे सेवक, तैसेच स्वामीचे सेवक. स्वामीविना आह्मास अन्य दैवत नसे. सर्व जोड स्वामीचे चरणाची जाहली ह्मणजे सार्थक आहे. जे स्वामी आज्ञा करितील ते शिरसा आहे. विशेष गोविंदपंत याजबरोबर पत्र आलें त्यामध्यें आज्ञा कीं, श्रीचा ऐवज कंदी रुपये मोहरा पुतळया होन सोनें व रुप्याचे दागिने जे असेल ते रवाना करणें ह्मणोन आज्ञा केली. आज्ञेप्रमाणें स्वामीचा ठेव होता, तो रवाना केला आहे.
नगद रुपये मोहरा होन पुतळ्या
६६१५ १५६ २१ १ सं
५६ नि
_________
५७
सोनें कडे वजन ।. एकूण तोळे सहा.
रुपये दागिने पेशजी कागदाप्रणें आहेत. ते निगेनशी ठेविले आहेत. जेव्हां स्वामीची आज्ञा होईल तेव्हां पाठवूं.
एकूण नगद रुपये साहजार साशेपंधरा व एकशे छपन्न मोहरा एकवीस होन, पुतळया सत्तावन सोनें कडें वजन पावशेर येणेंप्रमाणें स्वामीचा ठेव पाठविला आहे. स्वामीनीं लिहिलें कीं, खर्चास पाहिजे. याजकरितां रवानगी केली आहे. वरकड निगादास्त होणें तें स्वामीचे आज्ञेप्रणें होतच आहे. आह्मीं एकनिष्ठ सेवक आहों. स्वामीचे सेवेशी अंतर पडणार नाहीं. ऐवजाबराबर शाहाणें माणूस देऊन रवाना करणें ह्मणोन आज्ञा केली. आज्ञेप्रमाणें तानाजी यादव व बाबाजी जाधव देऊन पाठविले आहेत. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना. स्वामीचे तांदूळ तीन खंडी आहेत. त्याजविशी दोन वेळां लिहिलें की, पर्जन्य समीप आला. पर्जन्यकाळी तांदूळ जाया होतात. जागा सर्दीची. स्वामीस विदित आहे. उघाडी आहे तों तांदूळ न्यावयाची आज्ञा केली पाहिजे. बैल आले ह्मणजे रवाना करून. सेवेशी श्रुत होय. हे विज्ञापना. नगदी ऐवजास घागर तांब्याची १ व पितळी कासांडी १ तांबे पितळी २ एकूण चार दागिने होते. यापैकीं घागर तांब्याची हल्ली घेऊन आले आहेत. पितळी कासांडी व तांबे पितळी दोनी येकूण तीन दागिने राहिले आहेत. सेवेशी श्रुत होय हे विज्ञापना.