[४१] श्रीभार्गव
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप श्रीपाद स्वामीचे सेवेशी.
अपत्यें हरजी नाईक नामजाद प्रांत सुवर्णदुर्ग चरणावरी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग दंडवत. विनंति. त॥ छ १५ मोहरम पावेतों अपत्याचें व प्रांत मजकुरचे वर्तमान स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. स्वामीनें बाबाजी हरकार याज ब॥ आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन दर्शनतुल्य वंदून समाधान पावलों. तेथें आज्ञा कीं, पक्व अननसे जरूर पाठवून देणें. ऐशियास स्वामीचे आशीर्वाद पत्र आलें नव्हतें. तों अगोदरच राजश्री केसो बल्लाळ कुलकर्णी अंजरलेकर यांणींही स्मरण केले. त्यावरून वेठेदेखील जमा करून हल्लीं जिन्नस पाठविला. याच प्र॥ छ ९ रोजीं रवानगी करावयाची तयारी केली. इतकियांत हुजूरून गलबत आलें. त्यावरी वर्तमान आलें कीं स्वामीची स्वारी विजेदुर्गी जाहली आहे. त्यावरून रवानगी खोटी जाली. हें वर्तमान स्वामीस कळावें ह्मणोन लिहिलें असे. हल्ली बाबाजी हरकार वगैरे माणूस या ब॥ वेठे ५ एकूण जिन्नस रवाना केले असे. बितपशील :-
मध दमगर १, आंबे ओझें १ फणस कापे २ अननासे १० सु॥ १० एकूण वजन १.
_________________
सु॥ १००
शाळी मव्हेयाची सु॥ ५ पान येलीची सु॥ ५०००
येणें प्र॥ जिन्नस रवाना केला असे. मध अकढी असे. कढून गाळून पाठवावा. तो उन्हामध्यें फुटला. याकरितां अकढीच पाठविला असे. तेथें कढून गाळवावा. या खेरीज केसोपंती वेठया खुद्द आपणांकडील सामान देऊन सेवेशी पाठविला असे. पावलियाचे उत्तर पाठवावयास आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. मी स्वामीचा स्थापित येथें आहे. सर्व प्रकारें आशीर्वाद देऊन सनाथ करणार स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञापना.