नक्कल
[३१] श्री ४ आगस्ट १७३१
तीर्थस्वरूप राजश्री परमहंस स्वामीचे सेवेशी.
अपत्ये सन सौभाग्यादि संपन्न सकवारबाई२७ व सौ॥ सगुणाबाई दंडवत. विनंति उपरी येथील कुशल जाणून स्वकीय लेखन करीत गेलें पाहिजे. यानंतर स्वामीनीं आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट जाहलें. लिहिलें कीं, चिरंजीव राजश्री फत्तेसिंगदादा यांचे भेटीस गेलों होतों. भेटी जाहली. बहुत सन्मानेंकरून पुजा केली होती. घोडे पालखीत बैसवून आज्ञा दिल्ही. सोवारीं धावडशीस आलों. व चिमणाजीपंत दादा यांस देवाज्ञा जाहली. त्याच्या चिरंजीवाचा परामर्ष करावा, ह्मणून लिहिलें. ऐशियास चिरंजीवाचे भेटीस गेला, उत्तम केलें. यांनीं स्वामीची पुजा सन्मानेंकरून केली यावरून चित्तास बहुत आनंद जाहला. तुह्मा महापुरषाची पूजा न करते तर कोणाची करतील? चिमणाजीपंताचें वर्तमान तर दैवगतीस इलाज आहे असें नाहीं. त्यांच्या चिरंजीवाचे परामर्षास अंतर देणार नाहीं. वरकड संतान वृध्दीचा म॥ लिहिला तर आपली निष्ठा स्वामीच्या पायाशीं दृढतर आणि आपली कृपा आमचे ठाईं अन्यथा होईल असें नाहीं. आपले आशीर्वादेंकरून फलत्कारही होईल. प्रसाद श्रीफळें २ दोन व साखरपुडा १ पाठविला तो पावला. अत्यादरेंकरून मस्तकीं ठेवून स्वीकार केला. निरंतर आशीर्वादपत्रीं सांभाळ केला पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा निरंतर असो दीजे हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड तिसरा ( १७०० -१७६०)