प्रस्तावना
असे असून ब्रह्मेंद्र नीतिमत्तेचा केवळ पुतळा होता म्हणून रा. पारसनीस वर्णन करतात! तेव्हां असा वस्तुविपर्यास करण्यात त्यांचा हेतू काय असावा बरें? आपले पूर्वज मोठे होते, शूर होते, कर्तृत्ववान् होते, नीतिमान होते, अशी अभिमानाची प्रौढी मिरविण्यांत मौज आहे खरी; परंतु ते सर्वगुणसंपन्न होते, त्यांच्यांत दोष बिलकुल नव्हते, तें नीतीचे केवळ पुतळे होते, वगैरे देवांना साजणा-या गुणांचा आरोप त्यांजवर करणें म्हणजे मनुष्यस्वभावाची अट्टाहासानें थट्टा करणेंच आहे. वर्तमान व भावी पिढ्यांना आपल्या पूर्वजांचे गुणदोष कळावे, कोणत्या गुणांच्या जोरावर ज्यांनी राष्ट्राची उन्नति केली, व कोणत्या दोषांच्यामुळें तें राष्ट्राच्या अवनतीला कारण झाले, हें ज्ञान त्यांस व्हावें, हा तर इतिहास लिहिण्याचा प्रधानहेतु आहे. तो एकीकडे सारून काल्पनिक वर्णनें लिहिण्यांत तात्पर्य काय? ब्रह्मेंद्रस्वामी नीतिमान् होता, गोविंदपंत बुंदेले स्वामिनिष्ठ होता, महादजी शिंदे महाराष्ट्रसाम्राज्याभिमानी होता, वगैरे वर्णनें वाचलीं म्हणजे वाचकांच्या मनांत कारणांचा विपर्यास उत्पन्न होतो व तो भलत्याच विचारसरणीचा अवलंब करतो. तो म्हणतो, एवढें नीतिमान्, स्वामिनिष्ठ व अभिमानी पुरुष राष्ट्रांत असतांना, ज्याअर्थी पानिपतासारखें संकट आलें व १८१८ तल्यासारखी क्रांति झाली, त्याअर्थी आपल्या ह्या देशाची भवितव्यताच बलीयसी, दुसरें काहीं नाही! ही दैववादाची विचारसरणी मोठी घातुक आहे. ह्या सरणीचा मनावरती एकदां पगडा बसला म्हणजे प्रयत्नाची दिशा-जी राष्ट्रांच्या उन्नतीचा केवळ प्राण आहे-तिची वाढच खंटते. क्लाईव्ह, हेस्टिंग्स, वगैरे लोकांची काल्पनिक चरित्रें लिहिण्यांत इंग्रज लेखकांना काय फायदा वाटत असेल तो असो, आपल्या इकडे असल्या चरित्रांना अजिबांत फांटा देणें अत्यंत जरूर आहे. शनिमाहात्म्य, बुधबावन्नी, शिवलिलामृत वगैरे काल्पनिक व दैववादी पुस्तकांचा आपल्या इकडे भरणा कमी आहे असें नाहीं. त्यांतच ऐतिहासिक काल्पनिक चरित्रांची भर घालण्यांत फायदा कोणता?