प्रस्तावना खंड ३ रा
३०. असो. मराठ्यांच्या राजकारणांत स्वामीचें महत्त्व कितपत होतें, ह्या गोष्टीची शहानिशा येथपर्यंत झाली. तीवरून इतकें कळून आले कीं:-सूत्रधार ह्या नात्यानें मराठ्यांच्या राजकारणांत ब्रह्मेंद्राचा बिलकुल संबंध नव्हता; मराठ्यांच्या राजकारणाचीं अंतर्व्यवस्था किंवा बहिर्व्यवस्था म्हणजे सरंजामी सरदारीची पद्धति किंवा संयुक्त साम्राज्याची पद्धति ह्यांच्या उत्पत्तीशीं स्वामींचा दुरूनहि परिचय नव्हता; मराठ्यांच्या कोंकणांतील राजकारणाशीं स्वामीचा जो कांही संबंध झाला तो प्रधान स्वरूपाचा नसून सर्वस्वी गौण प्रकारचा होता; हा संबंध यद्यपि गौण प्रकारचा होता तत्रापि त्याचे परिणाम अत्यंत हानिकारक झाले; ती हानि भौतिक नव्हती, नैतिक होती; शाहू व बाजीराव ह्यांचें गुरुत्व स्वामीला प्राप्त झाल्यामुळें ह्या हानींचें स्वरूप फारच भयंकर झाले; ‘यश्चदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः’ या न्यायानें स्वामीच्या दुर्गुणाचे अनुकरण इतर सरदार करूं लागले; त्यावेळच्या ह्या सरदारांचे अनुकरण पुढील दोन तीन पिढ्यांनीं केलें; व भूमितिश्रेढीनें चाललेले हें अनुकरण मराठ्यांच्या राष्ट्राच्या नाशास कारणीभूत झालें.
३१. बह्मेंद्रस्वामीच्या हालचालीचें खरें स्वरूप हें असें आहे. ब्रह्मेंद्रस्वामीचा पत्रव्यवहार आज मिळाला आहे तितका जर मिळाला नसता तर ह्या स्वरूपाचें खरें चित्र जसें रेखडतां यावें तसें खचित आलें नसतें. आजपर्यंत लोकांचा असा समज होता कीं, ब्रह्मेंद्रस्वामी राष्ट्रांचा उद्धार करणारे जे थोडे महापुरुष ह्या महाराष्ट्रांत झाले त्यांपैकींच एक होता. ह्या गैरसमजानें कित्येकांनीं ब्रह्मेंद्रस्वामीचीं श्रीसमर्थ रामदासस्वामींशीं तुलना केली आहे. परंतु हे तुलना करणारे लोक असा विचार मनांत आणीत नाहींत की ह्या आपल्या राष्ट्रांत रामदास स्वामींसारखे महात्मे जर पिढ्यान पिढ्यां उत्पन्न झाले असते, तर आपली नैतिक व अर्थात् राजकीय अवनति झाली नसती. शिवाय हे तुलना करणारे लोक हेंहि विसरतात कीं कोणत्याहि ऐतिहासिक पुरुषाच्या गुणदोषांचे जें चित्र काढावयाचें असतें. तें दस्तऐवजी पुराव्यावरून काढावयाचें असतें. रा. पारसनिसांनीं ब्रह्मेंद्रस्वामीचें जे चरित्र स्वामींच्या पत्रव्यवहाराला जोडले आहे, त्यांत ह्या दोन्ही गोष्टींचा त्यांनी विचार केलेला दिसत नाहीं. रा. पारसनिसांनी छापिलेले दस्तऐवज पहावे तर त्यांत स्वामीचें जें चरित्र दृश्यमान होत आहे, तें सदर गृहस्थांनीं लिहिलेल्या चरित्राशीं बिलकुल जमत नाहीं. एखाद्या बगल्या वकिलानें एखाद्या कुळाचा कब्जा घ्यावा, न्यायाधीशापुढें आपल्या कुळाच्या नालस्तीचे तेवढे दस्तऐवज रुजूं करावे आणि तोडानें मात्र कुळाच्या साळसूतपणाचे पोवाडे गावे, तशांतलाच प्रकार प्रस्तुत इतिहासपटूचा झाला आहे! बाजीराव चिमाजी अप्पा, शाहूमहाराज वगैरे मोठे मोठे लोक, आपण ईश्वरांश आहांत, आपण कर्तेकरविते आहांत, आपले आम्ही चरणरज आहों वगैरे बहुमानार्थी मायने स्वामीला उद्देशून लिहितात, त्याअर्थी स्वामी खरोखरच महापुरुष असावा, मराठ्यांच्या राजकारणाचा सूत्रधार असावा, अशी रा. पारसनीस यांची समजूत झालेली दिसते; परंतु ज्या पुरुषाला गुरु केला, त्याला परम दैवत समजण्याची जी आपल्या देशांत बरी किंवा वाईट चाल आहे, तिच्या अनुरोधानें ह्या लोकांनी हे मायने लिहिले आहेत, ही गोष्ट जर त्यांनी आपल्या डोळयांपुढें ठेविली असती, तर ह्या दस्तऐवजांतील मजकुराचा खरा अर्थ समजण्याच्या मार्गाला लागण्याची त्यांना एक उत्तम सोय झाली असती. शिवाय ज्या नायकाचें किंवा नायिकेचें चरित्र लिहावयाला घ्यावयाचें तो नायक किंवा ती नायिका रणपटु, विद्यापटु, दानपटु शौर्यपटू अथवा सर्वगुणपटु दाखविणे आपलें कर्तव्य आहे असें ह्या इतिहासप्टुला वाटत असल्यामुळें, त्याच्या हातून हे असले बगल्या वकिलाचें अर्धवट मासले लोकांच्या पुढे मांडले जातात. रा. पारसनिसानीं अस्सल लेख छापिले नसते आणि स्वामीचें चरित्र लिहिले असतें, व त्यांत स्वामी सर्वगुणसंपन्न होता असें विधान केलें असते, तरीदेखील मनुष्यमात्राच्या ठायीं सर्वगुणसपन्नत्वाचा आरोप केलेला पाहून सदर विधान अवास्तव आहे, असें म्हटल्यावांचून रहावतेंना. रा. पारसनिसांनी तर अस्सल लेख छापून सर्वगुणसंपन्नतेचा समारोप स्वामींवर केलेला आहे. त्यामुळे क्लाईव्ह, वारन हेस्टिंग्स वगैरे आंग्लराजकार्यधुरंधरांच्या मेकाले वगैरेंनीं काढिलेल्या मलिन चरित्रपटांवर सफेतीचा हात फिरविणा-या कित्येक आधुनिक इंग्लिश इतिहासपटूंचे स्मरण होतें. ब्रिटिश संयुक्त साम्राज्याच्या हिंदुस्थानांतील भागाचे जे मूळ संस्थापक होते, ते नैतिकदृष्ट्या फार हलक्या दर्जाचे होते असें बर्क, मेकाले वगैरे राष्ट्रांच्या ख-या हिताचें इंगित जाणणा-या लेखकांचें मत होतें. यद्यपि हें मत खंरे आहे, तत्रापि सध्याच्या ब्रिटिश साम्राज्याच्या इभ्रतीला व नीतिमत्तेला कमीपणा आणणारें हे मत आहे असें कित्येक आधुनिक अँग्लोइंडियनांना वाटून त्यांनी उपरिनिर्दिष्ट सफेती देण्याचा उद्योग केलेला आहे. बर्क व मेकाले ह्यांच्या लेखांपुढें ह्या सफेतीवाल्याचें कितपत तेज पडेल तें पडो; इतकें मात्र म्हटल्यावांचून रहावत नाहीं, कीं ही खोट्याचें खरें करून दाखविण्याची सोफिस्टांची युक्ति साक्रेटिसाच्या वेळीं जितकीं तिरस्करणीय वाटत होती. तितकीच सध्यांहि वाटते. रा. पारसनिसांच्यासंबंधानेंहि हाच न्याय लागू पडतो. ब्रह्मेंद्रस्वामीच्या पत्रांत स्वामीचें वर्तन राष्ट्रीय नीतिमतेच्या दृष्टीनें अत्यंत गर्हणीय होतें, ह्याचे दाखले पदोपदीं सांपडण्यासारखे आहेत.