प्रस्तावना
२८. स्वामीच्या चरित्राचें वरील वर्णन वाचून कित्येकांना अशी जिज्ञासा उत्पन्न होण्याचा संभव आहे कीं, बाजीरावाची इतकी मनधरणी करण्यांत स्वामीचा हेतू तरी असा काय होता? ह्या प्रश्नाला उत्तर देतांना एक गोष्ट सांगून ठेवणें जरूर आहे. ती ही कीं, स्वामीमजकूरांनी नांवाला मात्र परमहंसत्वाची दीक्षा घेतली होती. बाकी त्यांच्या आत्म्यावर वासनांच्या गोधडींची जाड पटलें बसलेली होतीं. दिल्ली आग्र्यापर्यंत बाजीरावांचे गुरू म्हणून कीर्ति व्हावी (पा. ब्र.च. ले ३२०). सर्व मराठमंडळात मान मिळावा, सर्वांनीं आपणास भिऊन असावे, ही स्वामीच्या मनांतील पहिली जबरदस्त आकांक्षा होती. ही मानसिक आकांक्षा तृप्त झाल्यावर, स्वामीचा हेतू, पुष्कळ द्रव्य संपादन करून व अनेक गांवें इनाम मिळवून शरीरसुखाचीं साधनें वाढवावीं असा होता. बाजीरावाच्या व छत्रपतीच्या जोरावर, सरदारांना दहशत घालून स्वामी हजारों रुपयाची भिक्षा कमवी, नानाप्रकारचीं वस्त्रें व भूषणें मिळवीं व परोपरीचीं खाद्यपेयें संग्रह करीं. कायमची व हंगामी मिळून स्वामीची वार्षिक प्राप्ति पंचवीस हजारांच्या खाली नव्हती. ह्यापैकीं बराच भाग स्वामी अडल्यावेळी बाजीरावाला कर्जाऊ देत असे. इतर सरदारांना भय घालणें, त्यांचीं गृहछिद्रें शोधून काढणें, प्रतिपक्षांची निंदा करणें बाजीरावाची शिफारस करणें व छत्रपतींचें सूत्र राखणें, ह्या पंचविध सेवेखेरीज ब्रह्मेंद्रस्वामी बाजीरावाची द्रव्यसेवाहि करी. बाजीराव ब्रह्मेंद्रस्वामीचा जर कोणत्याहि एका गोष्टींत मिंधा असला तर तो ह्या द्रव्यसेवेंतच विशेष होय. स्वामीनें कर्जाच्या फेडीविषयीं तगादा केला म्हणजे बाजीराव गोगलगाईप्रमाणें त्याच्यापुढे मऊ होऊन जाई. कर्जानें भंडावून गेल्याविषयी स्वामीला बाजीरावानें जी पत्रें धाडलीं आहेत तीं इतर सावकारांच्या तगाद्याला अनुलक्षून आहेत असा कित्येकांचा व विशेषतः ग्रांटडफचा समज आहे. परंतु हीं पत्रें व ह्या पत्रांतील विनवण्या खुद्द स्वामीच्या तगाद्यानें वेडावून जाऊन स्वामीलाच लिहिलेल्या आहेत, हे सदर पत्रांतील मजकूराकडे बारीक लक्ष दिलें असतां समजून येण्यासारखें आहे. इतर सावकारांचे तगादे सदोदित चालूं असतां, स्वामीचा तगादा येऊन पोहोंचला म्हणजे स्वामीच्या हृदयाला पाझर फुटण्याकरितां बाजीरावानें हीं पत्रें लिहिलेलीं आहेत. रा. पारसनीस यांनीं छापिलेली लेखांक ३०, ३१ आणि ३२ हीं पत्रें बाजीरावाच्या ओढगस्तीसंबंधीं आहेत. “कर्जाचे ऐवजीं पांच हजार रुपये पाठवणें” म्हणून लेखांक ३० त स्वामी बाजीरावास लिहितो. रुपये पुढें पावते करूं, म्हणून बाजीरावानें उत्तर दिलें आहे. लेखांक ३१ व ३२ यांत शिलेदारांच्या देण्यासंबंधानें काय अपेष्टा होतात ह्याचेच वर्णन बाजीराव करतो. शिलेदारांचे पाया पडंता पडतां कपाळ छिनत चाललें असतां, स्वामीनेंहि आपल्या पैक्याचीहि मागणी केली. उंटाला एकादेवेळी काडीचेंहि ओझें फार होतें, त्याप्रमाणें बाजीरावाला स्वामीचीहि मागणी अत्यंत निष्टुरतेची वाटली. अशा महत् विवंचनेंत असतांना स्वामीला बाजीरावानें हें पत्र लिहिलें आहे. बाजीरावाला वंगवण्याची स्वामी अशीच एखादी संधि पहात असे. अन्य वेळीं डौलानें व तो-यानें वागणारा बाजीराव अशा वेळीं अगदी गयावया होऊन जाई. ज्याच्यापुढें सर्व जग चळवळ काप्पे तो बाजीराव नम्रतेच्या गोष्टी बोलूं लागावा, एवढेंच स्वामीला हवें असे.