प्रस्तावना
२७. इतर सरदारांशीं स्वामी यद्यपि मानभावीपणानें, उर्मटपणानें व बेपर्वाईनें वागे, तथापि छत्रपति व बाजीराव, ह्यांच्याशीं त्याचे वर्तन फारच निराळ्या प्रकारचें असे. छत्रपतींशी अदबीनें व बाजीरावाशीं मित्रत्वानें वागण्याचा स्वामीचा परिपाठ असे. महाराष्ट्रांतील त्यावेळच्या ह्या सूत्रधारांशी ह्या अशा रीतीनें वागल्याशिवाय इतर सरदारांवर शिरजोरपणा स्वामीला करतांच आला नसता. बाजीराव जें जे करी तें तें स्वामीला उत्तमच वाटे व तसें वाटतें असें दाखविण्याशिवाय दुसरी सोयच नव्हती. बाजीराव ही व्यति इतकी स्वतंत्र आचाराची व स्वतंत्र विचाराची होती कीं, ब्रह्मेंद्रासारख्या जोग्याला त्याच्या सूत्रानेंच चालणें जरूर पडे. बाजीरावाचा ज्यांच्याशीं स्नेह त्यांच्याशीं स्वामी स्नेहानें वागे व बाजीरावाच्या शत्रूंशी स्वामी बाकून राही. उदाहरणार्थ श्रीपतराव प्रतिनिधीशीं स्वामीचीं वागणूक कोणत्या प्रकारची होती तें पहा, रा. पारसनिसांनीं छापिलेल्या लेखांक १, २, २१४, २१६, २१७, २१८, २१९, २२०, ह्या पत्रांत स्वामींची कांहींना कांहीं तरी तक्रार प्रतिनिधीच्या विरुद्ध आहे व प्रतिनिधीनें ती कांही ना कांहीं तरी सबब लढवून फेटाळून टाकिली आहे. उमाबाई दाभाडणीशींहि स्वामींचे वर्तन असेंच मानभावीपणाचें होतें. त्र्यंबकराव दाभाडे व कृष्णाजी दाभाडे ह्या चुलत भावांत भांडण-तंटे उपस्थित करून कृष्णाजीला बाजीरावाच्या पक्षाला ओढणारा स्वामीच होता. त्र्यंबकराव डभईंच्या लढाईत पडल्याची वार्ता स्वामीला प्रथम कृष्णाजी दाभाड्यानें कळविली आहे (पा. ब्र. च. ले. १८८). बाजीरावाचा शत्रू बाबूजी नाईक बारामतीकर ह्याची नालस्ती स्वामीनें पारसनिसांच्या ३०० व्या लेखांकांत केली आहे. सारांश ज्याच्यावर भोंकण्यास स्वामीला बाजीरावानें विनंति करावी, त्याच्यावर तुटून पडण्यास गुरुमहाराज एका पायावर तयार असत. बाजीरावाचें गुरुत्व संपादून स्वामीला जें श्रेष्ठपण मिळालें होतें, त्याची फेड स्वामीं हरहमेष करी. शाहूमहाराजांचें प्रेम बाजीरावावर रहावें ह्या हेतूनें स्वामी वारंवार छत्रपतींच्या दर्शनास जात असे. ‘सातारा दुष्टबुद्धि जे आहेत, त्यांचें राजास कळूं येतें’ (पा. ब्र. च. ले. २६८); ‘येथें तो अवघे पाच सा पातकी आहेत, उमाबाईकडे अवघे झाले आहेत’ (पा. ब्र. च. ले. २८७); ‘राजश्रीजवळ तुमची फारसी शिफारस केली, कित्येक तुमच्या स्वहिताच्या गोष्टी सांगितल्या’ (पा. ब्र. च. ले. २९); वगैरे उता-यांवरून छत्रपतींचें सूत्र राखण्याच्या कामीं बाजीरावाला स्वामीचा किती उपयोग होत असे तें उत्तम व्यक्त होतें. ब्रह्मेंद्र व बाजीराव ह्यांचे गुरुशिष्याचे नातें होते; परंतु ब्रह्मेंद्र बाजीरावाचा किती मिंधा होता हें ह्या उता-यावरून उत्तम लक्ष्यांत येतें. शिव्या, श्राप, स्तुति, निंदा वाटेल तें काम करण्यास बाजीरावाप्रीत्यर्थ ब्रह्मेंद्र तयार असे. अट एवढीच कीं, आपल्याला सर्व लोकांनीं भिऊन असावें, व आपल्याला कर्तुमकर्तु सामर्थ्य आहे अशी सर्वत्र समजूत व्हावी. आपण किती मोठे आहोंत हें समजण्याइतकी नाजूक दृष्टि कोणाला नसलीच,- बहुतेक लोकांना ती नसावीं अशी स्वामीची समजूत असे- तर स्वामी स्वतःच्या गुणांचें वर्णन जोरदार शब्दांनीं त्या मठ्ठ लोकांच्या डोक्यांत आपलें वैभव ठासण्याचा मनोरम प्रयत्न करी. स्वामीचें हे आत्मश्लाघापटुत्व एखाद्या वेळीं अशा कांहीं थरास जाऊन पोहोंचे कीं, आत्मश्लाघेवरून परनिंदेवरही स्वामी वेळ पडल्यास घसरत असे. आत्मश्लाघेचे दाखले स्वामीच्या पत्रांतून इतके पसरले आहेत कीं, सदर पत्रें सहज चाळणा-याला देखील ते थोड्याशा श्रमाने उपलब्ध होण्यासारखे आहेत.