प्रस्तावना
२६. हबशाच्या लढाईशीं किंवा वसईच्या मोहिमेशीं, किंवा इतर कोठीलहि मसलतीशीं ब्रह्मेंद्राचा जर म्हणण्यासारखा संबंध नव्हता, तर तो पुढारी ह्या पदवीला कधींच पोहोंचला नव्हता व त्याच्या अगंच्या दुर्गुणांचा वर वर्णन केला इतका प्रभाव होण्याचा संभव मुळींच नव्हता अशी शंका आणतां येण्याजोगी आहे. आंग्रे, दाभाडे वगैरे एक दोन सरदारांशींच काय तो स्वामीचा निकट संबंध होता व त्यांच्यांशीं केलेल्या दुर्वर्तनाचा इतका दूरवर परिणाम पोहोचेल हें संभवत नाहीं असेंहि कित्येकांचे म्हणणें पडेल. ह्या शंकांवर उत्तर असें आहे कीं, यद्यपि लढाया, मोहिमा वगैरे मसलतींशीं स्वामींचा संबंध नव्हता, व ह्या नात्यांनी यद्यपि त्याला पुढारी ही संज्ञा देतां येणें मुष्कील आहे, तथापि बाजीराव, चिमाजी अप्पा, शाहूमहाराज वगैरे महाराष्ट्रांतील अत्यंत श्रेष्ठ पुरुषांचें गुरुत्व स्वामीस प्राप्त झाल्यामुळें त्याच्या शब्दाला व हालचालींना एका प्रकारचें महत्त्व आलेलें होतें. शाहूमहाराज, बाजीराव व चिमाजी अप्पा ह्यांची कृपादृष्टि करून घेणें ज्यांस इष्ट असे, त्यांना ब्रह्मेंद्रस्वामीचें पाय धरणें उपयोगाचें होईल असें वाटण्याचा संभव असे. बाकी ब्रह्मेंद्रस्वामीची आराधना सदाच सफल होत असे असा मात्र नियम नव्हता. (१) सयाजी कनोजा म्हणून स्वामीच्या प्रीतींतील एक माणूस होता. त्याला सेखोजी आंग्र्यानें १७३० त कामावरून दूर केलें. ह्या मनुष्याला ब्रह्मेंद्रानें संभाजीकडे, बाजीरावाकडे व चिमाजी आप्पाकडे शिफारस करून पाठविले. परंतु ह्या शिफारसीचा कांहीं एक उपयोग झाला नाहीं. पुढे बाळाजी बाजीराव पेशवाईवर आल्यानंतर स्वामीनें कनोजाचें गा-हाणें त्याजकडे नेलें (पा. ब्र. च. ले. २८९ व ७२) व नोकरीचें आश्वासन मिळविलें. (२) सात शेणवयाला गोव्याकडे नेमावें म्हणून स्वामीनें शिफारस केली (पा. ब्र. च. ले. २८) परंतु ती साधक बाधक प्रमाणें दाखवून पेशव्यांनीं अमान्य केली. (३) मानाजी आंग्र्यांवर लोभ करावा म्हणून स्वामीनें चिमाजी अप्पास लिहिलें (पा. ब्र. ता. ले. १३२). सुधें वर्तल्यास त्यावर लोभ करूं म्हणून चिमाजीनें उत्तर दिलें. स्वामीच्या शिफारसीचा फारसा उपयोग झाला नाहीं असे आणीकहि दाखले स्वामीच्या पत्रव्यवहारांत पुष्कळ आहेत. त्यावरून असें दिसतें की, स्वामीची शिफारस योग्य असल्यास तिचा आदर पेशवे करीत असत. रा. पारसनिसांनीं छापिलेल्या १२५ वगैरे लेखांकांत योग्य शिफारसीचा आदर केलेला दृष्टीस पडतो. स्वामीच्या शिफारशींची अशी जरी व्यवस्था असे तत्रापि फलद्रूप होणा-या शिफारशींकडेच तेवढें लक्ष देण्याची गरज मनुष्यांची जी सार्वत्रिक चाल आहे, तिला अनुसरून अनेक सरदार व सरदारांच्या बायका प्रसंगविशेषीं स्वामीच्या मध्यस्थीचा उपयोग करून घेत असत. स्वामीचें मुख्य महत्त्व म्हटलें म्हणजे हेंच होतें. ह्याच महत्त्वाच्या जोरावर स्वामी पुष्कळ लोकांना टाकून बोले व छत्रपतींनीं माझा मान ठेविला, पेशव्यांनी माझा तसा बडेजाव केला, वगैरे गोष्टी सांगून तो चोहोंकडे आपली छाप बसवी. राधाबाई पेशवीण, राधाबाई थोरातीण, उमाबाई दाभाडीण, लक्ष्मीबाई आंग्री वगैरे सरदारस्त्रियांच्या पत्रांत स्वामीची छाप ह्या बायांच्या मनावर केवढी बळकट बसली होती हे उत्तम त-हेनें पहावयास मिळतें. संभाजीला श्रापून भस्म करून टाकिला, तुळाजीच्या पायांत बेडी अडकविली, शिद्दी सातासारखा दैत्य मारिला, कान्होजी आंग्र्याला नरकांत घातला, वीरूबाईची गत काय झाली (पा. ब्र. च. ले. २९१) वगैरे दहशती घालून सरदारांना पत्रें लिहिण्याचा व भिवडविण्याचाहि स्वामीचा परिपाठ असे. त्यामुळें स्वामी कोण्या वेळीं काय करील अशी भीति मनांत बाणून त्याला बहुतेक लोक फार करून नमूनच असत. राजाला किंवा बाजीरावाला सांगून आपल्याविषयीं त्यांचीं मनें कलुषित करील किंवा मंत्रतंत्रानें अथवा तपोबलानें आपलें अनिष्ट चिंतील, ही दुहेरी भीति स्वामीसंबंधानें बहुतेक लोकांच्या मनांत असे. देवभोळेपणानें भारून गेलेलीं हीं माणसें स्वामीचा राग होऊं नये म्हणून त्याला परम निष्ठेचीं पत्रे लिहीत व पेशव्यांच्या व छत्रपतींच्या विरुद्ध जाण्याचे नाना प्रकारचे उघड किंवा लपून डावपेंच करीत. हे डावपे.च सुरू झाले म्हणजे पेशव्यांना व छत्रपतींना त्यांना ताळ्यावर आणणें जरूर पडे व वैमनस्याचें बीज कायमचे रोविलें जाई. ह्या लोकांची ही अशी विपन्न स्थिति झाली म्हणजे स्वामी त्यांना शिव्या श्राप देण्याला तयारच असे मांडलिक सरदारांशीं स्वामीचा कार्यक्रम असा अरेरावीपणाचा असे.