प्रस्तावना
२५. ब्रह्मेंद्रस्वामीच्या हयातींत जी ही कारणपरंपरा सुरू झाली, तिचा अर्थ उत्कटत्वेंकरून मनांत भरण्यास दुस-या एका कारणपरंपरेशी तिची तुलना करून दाखविल्यास उत्तम होईल. शिवाजीच्या कारकीर्दीत रामदासस्वामीनें नीतिमत्तेचा, देशाभिमानाचा, परस्पर विश्वासाचा व राजनिष्ठेचा धडा घालून दिला. तो १६४६ पासून १६८० पर्यंत शिवाजीनें, शिवाजीच्या मुत्सद्यांनीं व शिवाजीच्या सरदारांनीं मनोभावाने गिरविला. पुढें संभाजी गादीवर येऊन त्यानें करूं नयेत अशीं अनन्वित कर्म केलीं. त्यांचीं फळेहि तो लवकरच पावला; परंतु त्याच्या गैदी व तामसी वर्तनानें वडिलोपार्जित स्वराज्य अवरंगझेबाच्या हातांत बहुतेक गेल्यासारखेंच झालें. शिवाजीनें, रामदासानें व तत्समकालीन मुत्सद्यांनीं व सरदारांनीं घालून दिलेला नीतिमत्तेचा, देशाभिमानाचा, परस्पर विश्वासाचा व राजनिष्ठेचा धडा पुढील पिढी कितपत गिरविते ह्याची परीक्षा ह्यावेळी झाली. राजारामाने देशत्याग केला. शाहू शत्रूच्या हातांत सांपडला, सर्व स्वराज्य मोंगलानीं पादाक्रांत केलें व अवरंगझेबानें नानाप्रकारचीं आमिषे दाखविली; परंतु ह्या संकटपरंपरेंतील एकाचीहि पर्वा न करतां ह्या पुढील पिढीतील मुत्सद्यांनीं व सरदारांनीं स्वातत्र्यार्थ लढण्याची पराकाष्ठा केली, व स्वातंत्र्य मिळविण्याचा पण शेवटास नेऊन आपलें पुढारपण व श्रेष्ठत्व सार्थ करून दाखविलें. ह्यावरून लक्षांत एवढेच घ्यावयाचें कीं, जाज्वल्य नितिमत्ता आपला गुण सहसा विसरत नाहीं. आतां ह्या नीतिमत्तेच्या धड्याच्या जोडीला दुस-या बाजीरावाच्या वेळची नीतिमत्ता अथवा अनीतिमत्ता घ्या. १७९६ पासून १८१८ पर्यंत बाजीरावाच्या कारकीर्दीत दंगेधोपे, परस्पर मत्सर, देशद्रोह, यादवीं, भ्रष्टाचार वगैरे सर्व कांही प्रकार होऊन, शेवटीं भरतखंडांतील मराठ्यांची सत्ता नष्ट होण्याची वेळ आलीं. दुष्ट, भ्रष्ट, भेकड, अविश्वासी, कर्तृत्वशून्य असा जो बाजीराव त्याचा जर द्वेष सर्व सरदारांना झाला होता तर त्याला काढून किंवा दाबांत ठेवून मराठ्यांची संयुक्त सत्ता राहिली नसती असे नाहीं. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन वगैरे सरदांची इभ्रत सरदारांची इभ्रत संयुक्तसत्ता तोलून धरण्याइतकी नव्हती अशी कांही नव्हती. महाराष्ट्रांतील शिल्लेदार, सुखवस्तू लोक, साधू, संत, भिक्षुक, शास्त्री कोठें पळून गेले होते अशांतलाहि प्रकार नव्हता; परंतु परस्पर विश्वास, देशाभिमान वगैरे जे राष्ट्रीय नीतिमत्तेचे मुख्य घटक त्यांची सर्वत्र वाण पडल्यामुळें ह्या सरदार, शिलेदार व मुत्सद्दी मंडळींनीं बाजीराव ब्रह्मवर्तास गेलेला सुखानें पाहिला. ब्रह्मेंद्रस्वामीनें घालून दिलेला चुगल्या करण्याचा, भांडणें लावण्याचा, विश्वासघात करण्याचा धडा दोन पिढ्या गिरविल्याचा हा परिणाम झाला. अवंरगझेबाच्या वेळीं ज्या राष्ट्रांतील पुढा-यानीं स्वातंत्र्यार्थ जिवापाड मेहनत घेतली, त्याच राष्ट्रांतील मंडळी बाजीरावाच्या वेळीं केवळ स्तब्ध व उदासीन राहिली. रामदासी व भार्गवरामी धड्याचे हे असे निरनिराळे परिणाम झाले. १७९५ त नाना फडणिसाच्या कारकीर्दीत जी टोलेजंग इमारत भक्कम असावी असें वाटलें, ती त्याच्यानंतर दहा पांच वर्षांत अशी एकाएकीं डबघाईस कशी आली ह्यांचें कित्येकांना आश्चर्य वाटतें. परंतु ह्या राष्ट्राची राष्ट्रीय नीतिमत्ता ब्रह्मेंद्रस्वामीपासून दोन तीन पिढ्या बिघडत बिघडत बाजीरावाच्या कारकीर्दीत पूर्णंपणें नासून गेलीं ही गोष्ट जर लक्ष्यांत घेतली तर आश्चर्य वाटण्याचें कांहीं एक कारण राहणार नाहीं. नाना फडणिसाच्या कारकीर्दीत महादजी शिंदे, तुकोजी होळकर, फत्तेसिंग गायकवाड, भोसले, पटवर्धन वगैरे महाराष्ट्र साम्राज्यांतील सरदारांनीं संयुक्त सत्तेला न जुमानतां परराष्ट्रांशीं तह करण्याचा अभ्यास केला व संयुक्त सत्तेची शकलें बहुतेक अर्धा मुर्धी करून ठेविलीं. नाना फडणिसासारख्या नीतिमान मुत्सद्याचें दडपण गेल्यावर ही अनीतिमत्ता पूर्णपणें अनियंत्रित झाली व ब्रह्मेंद्रस्वामीनें लाविलेल्या रोपास, कडू फळे आलीं.