प्रस्तावना
ह्या विनविण्यांचा परामर्ष स्वामी कसा काय घेतों हें पहावयास जावें तों निराळाच चमत्कार पहाण्याचा प्रसंग येतो. क्षुल्लक कारणावरून रागास पेटणें, शिव्याश्राप देणें, बंधुविरोध माजविणें, अभद्र शब्दांचा उच्चार करणें, असलें अनन्वित प्रकार परमहंसाचे चाललेले पहाण्यांत येतात. संभाजी व तुळाजी आंग्रे मूंर्खांतले मूर्ख व दुष्टांतले दुष्ट होते हें कबूल आहे. त्यांचें शासन छत्रपति व पेशवे राजरोस रीतीनें करीत होते. असें असतां ब्रह्मेंद्रस्वामी ज्याअर्थी खासगी द्वेषाचें व वैराचें निर्यातन करण्याच्या बुद्धीनें आंग्र्यांचा नाश करण्यास प्रवृत्त झाला, त्याअर्थी मराठ्यांच्या वाढत्या साम्राज्यांतील सरंजामी सरदारांना मुख्य सत्तेचे आधारस्तंभ बनविण्याच्या पुढारपणाच्या कामगिरीस स्वामीची लायकी फार कमी दर्जाची होती असें म्हणणें भाग पडतें. महाराष्ट्र त्यावेळी संयुक्त सत्तेचे स्वरूप धारण करीत होतेंच प्रत्येक सरंजामी सरदार आपापल्या ठिकाणीं साधेल तितके स्वातंत्र्य उपभोगण्याचा प्रयत्न करी. गुजराथेंत दाभाडे, खानदेशांत बांडे, व-हाडांत भोंसले व कोंकणात आंग्रे मुख्य सतेच्या विरुद्ध नाना युक्तीनीं जात. अशा प्रसगीं एकींचें माहात्म्य व दुहींचे दौर्बल्य, ह्या सरदारांच्या मनावर ठसवून मुख्य सत्तेशीं निष्ठापूर्वक वर्तन करण्याचा उपदेश स्वामीसारख्या निरिच्छ पुरुषाने करावयाचा. परंतु तसें कांहींएक न करितां, इतर सामान्य अप्पलपोट्या मनुष्याप्रमाणें स्वामी आंग्र्यांचा खासगी द्वेष करून जास्तच दुही माजवूं लागला, हें राष्ट्रांतील पुढा-यांचें गुरुत्व पावलेल्या पुरुषाला अगदीं शोभण्यासारखें नव्हतें. कामक्रोधादि षड्रिपूंना जिंकून यमनियमादि अष्टांगसिद्धि संपादिल्याचा आव ज्या पुरुषानें घालावा तोच जर क्षणोक्षणी कामक्रोधांच्या आधीन होऊं लागला, तर श्रेष्ठ पुरुषाचें अनुकरण करणारे सामान्य जन तमोवृत्तीचे मूर्तिमंत पुतळे बनल्यास आश्चर्य कोणतें? राष्ट्रांतील पुढा-यांची व श्रेष्ठ पुरुषांची दानत धुतल्या तांदळासारखी असली तरच इतर सामान्यजनांची नीतिमत्ता मर्यादेंत रहाते. पुढारी व श्रेष्ठ पुरुष कामक्रोधांनीं विकृत होऊन परस्परांना पाण्यांत पाहूं लागलें व असें तामसी वर्तन ठेवूनहि त्यांचा बडेजाव दिवसेंदिवस वाढतच आहे असें कांहीं कालपर्यंत दिसलें म्हणजे त्यांचें अनुकरण करण्याची इच्छा भोंवतालील मंडळीला व पुढील पिढीला अवश्मेव होते व कालांतरानें सर्वत्र बजबजपुरा माजून राष्ट्राचा विलय होतो. ब्रह्मेंद्रस्वामीनें आंग्र्यांशीं जे लावालावीचें नीच वर्तन केलें व ज्या नीच वर्तनाला भिऊन आंग्रे, दाभाडे वगैरे सरदारांना स्वामीचा दरारा भयंकर वाटला, त्याचेंच अनुकरण पुढील पिढींतील रघुनाथराव, सखारामबापू, सखाराम हरि, मल्हारराव होळकर, दमाजी गायकवाड, तुळाजी आंग्रे, गोविंदपंत बुंदेले, पटवर्धन, वगैरे मंडळींनीं केलें. ह्या दुस-या पिढीचे अनुकरण भोसल्यांचे दिवाण देवाजीराव, महादजी शिंदे, तुकोजी होळकर वगैरे नाना फडणिसाच्या समकालीन तिस-या पिढींतील पुढा-यांनीं केलें व ह्या तिस-या पिढीचें अनुकरण दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर, बाळोबा कुंजीर वगैरे सरसकट सर्व मराठा व ब्राह्मण सरदारांनीं केलें. सारांश, भगवीं वस्त्रें पांघरून कृष्णकर्मे करण्याचा, परस्परांत वैमनस्यें माजविण्याचा, ज्यांनीं विश्वास ठेविला त्यांचे गळे कापण्याचा धडा महाराष्ट्रांत ब्रह्मेंद्रस्वामीनें प्रथम घालून दिला व तो धडा पुढील एकेका पिढीनें जास्त जास्त गिरविला. महाराष्ट्राच्या नाशाला जी कारणपरंपरा साधनीभूत झाली, तिची पूर्वपीठिका ही अशी आहे.