प्रस्तावना
२४. हबशाच्या युद्धाशीं किंवा वसईच्या मोहिमेशीं सूत्रधार या नात्यानें ब्रह्मेंद्राचा कांहीं एक संबंध नव्हतां हें जरी खरें आहे, तथापि आंग्र्यांची सत्ता दुभंग करण्याच्या कामीं स्वामीने आपल्याकडून बरीच मेहनत घेतली होती, हें आतापर्यंत दिलेल्या कोंकणच्या हकीकतीवरून उघड आहे. हत्तीच्या प्रकरणावरून व कर्जावरून कान्होजीचें व स्वामीचे तेढें कसें आलें, सेखोजी, संभाजी, मानाजी व तुळाजी ह्यांचीं मनें स्वामीनें परस्परांविषयी कशीं कलुषित केलीं, त्यांना कोणकोणत्या धास्त्या घातल्या वगैरे प्रकरणांचें वर्णन मागें दिलेंच आहे. ह्या वर्णनावरून स्वामीची सर्वाभूतांच्या ठायीं कितपत समबुद्धि होती, हें वरवर वाचणा-या वाचकांसहि कळून येण्यासारखें आहे. खरें म्हटलें असतां, आंग्र्यांचा नाशच पहाण्याची जर स्वामीची इच्छा होती, तर स्वामीनें कांहीं एक खटपट केली नसती तरी देखील चालण्यासारखें होतें आंग्रे आपल्या कर्मानेंच मरत होते. छत्रपतीच्या व बाजीरावाच्या विरुद्ध जाण्याचा आंग्र्यांचा जन्मस्वभावच होता व त्यांचे पाय लंगडे करावे असा शाहूचा व बाजीरावाचा विचारच झाला होता. संयुक्त साम्राज्यांतील सरंजामीं सरदार छत्रपतींच्या किंवा त्यांच्या मुख्य प्रधानाच्या हेतूंच्या विरुद्ध जेव्हां जात, तेव्हां त्यांस तंबी पोहोचविणें, त्याचीं मनें ताळ्यावर आणणें किंवा तीं ताळ्यावर येत नसल्यास त्यांची सत्ता कमी करणें, हें त्यावेळच्या मराठ्या मुत्सद्यांचे कर्तव्य होऊन बसले होतें. ह्या कर्तव्यकर्मास सादर होऊन बाजीरावानें श्रीपतराव प्रतिनिधि, त्र्यंबकराव दाभाडे, कंटाजी कदम बांडे, पिलाजी जाधवराव, दमाजी थोरात वगैरे मंडळींचें वेळोवेळीं शासन केलें. अशा वेळीं ब्रह्मेंद्रस्वामीसारख्या मनुष्याचें कर्तव्य कांहीं निराळ्याच प्रकारचें असले पाहिजे होतें. महाराष्ट्र साम्राज्यांतील मुख्य सत्तेच्या केंद्रीकरणार्थ बाजीरावानें आरंभिलेल्या कर्तव्यात्मक निष्ठुर कृत्यास ब्रह्मेंद्रानें साहाय्य निराळ्या प्रकारचे केलें पाहिजे होतें. कार्यकर्त्यां पुरुषांच्या निष्ठुर वर्तनाचे जे भयंकर आघात होतात, ते प्रतिपक्षाच्या हृदयांत खोल घरें करतात व त्याचे परिणाम फार दूरवर पसरतात. अशा वेळी आघाताचा भयंकरपणा सौम्य करण्यास भारदस्त मध्यस्थ लागत असतात. ब्रह्मेंद्रासारख्या उदासीन पुरुषाचें हें मध्यस्थीचें काम होतें. तो उदासीन पुरुषच जर भ्रांतचित्त झाला, तर भोंवतालील राजकीय वातावरण क्षुब्ध झाल्यास नवल कसचें? प्रस्तुत खंडांत छापिलेलीं आंग्र्यांचीं पत्रें किंवा रा. पारसनिसांनीं छापिलेलीं पत्रें पहावीं तर त्यांत सेखोजी, संभाजी, तुळाजी, मानाजी, मथुराबाई, लक्ष्मीबाई, आपल्यावर स्वामीनें मेहेरनजर करावी, छत्रपतींचें मन आपल्याविषयीं प्रसन्न करावें, पेशव्यांचें व आपलें सौरस्य करून द्यावें, अशा विनवण्या परम नम्रतेनें करीत आहोत असें दृष्टोत्पत्तीस येतें.