प्रस्तावना
तेव्हां स्वामीच्या मसलतीचा ठसा जर कांहीं कोठे उमटला असेल तर तो हिंदुस्थानच्या राजकारणांत किंवा दक्षिणच्या राजकारणांत उमटला नाही हें निश्चित आहे. दक्षिण व हिंदुस्थान वगळून बाकी राहिलेलें जें कोंकण, तेथील राजकारणांत स्वामीचा कांहीं हात होता हें मात्र प्रांजलपणें कबूल केलें पाहिजे. आता कोंकणच्या मसलतींत स्वामीचा हात होता ह्या विधानाचा अर्थ स्वामीं कोंकणच्या मसलतीचा सूत्रधार होता असा करण्यांत तात्पर्य नाहीं. कां कीं, १७२६ त जंजि-याच्या हबशाशीं जें युद्ध सुरू झालें, तें ब्रह्मेंद्र वरघांटी येण्याच्या पूर्वी झालेलें होतें, हें ध्यानांत धरिलें पाहिजे. तसेंच हें युद्ध १७२६ त निजामुन्मुलुखाशीं सुरूं झालेल्या युद्धाचा भाग होता, हेंहि लक्षांत घेतलें पाहिजे. शिवाय हबशाशीं युद्ध सुरू असतांना, त्याचा हत्ती सावनुराहून आणण्याचा पत्कर स्वामीनें ज्याअर्थी घेतला होता त्याअर्थी लढाई सुरू होतांना ब्रह्मेंद्राचा व हबशाचा स्नेह होता हें सिद्ध आहे. अर्थात् ब्रह्मेंद्र जंजिरेकर हबशाच्या युद्धाचा मूळ सूत्रधार होता असें विधान बिलकुल करतां येत नाहीं. आपला हत्ती स्वामीनें आंग्र्यांच्या हातांत जाणूनबुजून जाऊं दिला अशी गैर समजूत करून घेऊन हबशानें जेव्हां ब्रह्मेंद्राच्या देवालयाचा उध्वंस केला, तेव्हां हबशाचा सूड उगविण्याच्या इच्छेनें स्वामी साता-यास आला व हबशाचा नाश करण्यास शाहूस व बाजीरावास प्रोत्साहन देता झाला. स्वामीच्या देवालयाचा उध्वंस हबशानें केला नसता, तत्रापि त्याचें पारिपत्य करणें शाहूस आवश्यकच झालें होतें. निजामुन्मुलूख व कोल्हापूकर संभाजी ह्यांचा हस्तक जो हबशी त्याचा पाडाव करणें हें त्यावेळच्या युद्धाचें एक अंगच होतें. सारांश, प्रासंगिक प्रोत्साहनाव्यतिरिक्त स्वामीचा हबशाच्या युद्धाशीं फारसा संबंध नव्हता. हबशाच्या युद्धांनतरचें दुसरें मोठें कोंकणांतील युद्ध म्हटलें म्हणजे वसईची मोहीम होय. ह्याहि युद्धाचीं मूळ सूत्रें स्वामीनें हलविलीं असें म्हणण्यास पुरावा नाही. कारण कीं, वसईच्या मोहिमेचा बूट खंडोजी माणकर, मोरोजी शिंदे वगैरे साष्टींतील मसलती पुरुषांनीं चिमाजी आप्पा कोंकणांत १७३७ त उतरण्यापूर्वीच काढिला होता. वसईच्या मोहिमेची बारीक पूर्वपीठिका साष्टीच्या बखरींत बरीच इत्थंभूत दिली आहे, तींत ब्रह्मेंद्रस्वामीचा दुरूनहि उल्लेख केलेला नाहीं. १७३७ त चिमाजी आप्पा कोंकणांत साष्टीकडे गेला, त्यावेळीं मात्र ब्रह्मेंद्रानें वसई तुम्हांस खास मिळेल, असा आशीर्वाद वारंवार दिला. ह्या आशीर्वचनाव्यतिरित ब्रह्मेंद्रानें वसईची मोहीम फत्ते होण्यास कांहीं साहाय्य केलें होतें असें दिसत नाहीं. सारांश, मराठ्यांच्या साम्राज्याच्या मूलस्थापनेशी किंवा वर्धमानस्थितीशीं सूत्रधार ह्या नात्यानें ब्रह्मेंद्राचा काहीं एक संबंध नव्हता असें म्हटल्यावाचून गत्यंतर नाहीं.