प्रस्तावना
फितूर झालेल्या जाधव, निंबाळकर वगैरे सरदारांना निजमुन्मुलुखानें सरंजाम दिल्यामुळें तितक्याच योग्यतेची लालुच आपल्याहि सरदारांना देण्याशिवाय दुसरी सोय शाहूजवळ राहिली नाहीं. सरदारांना सरंजामी करून टाकिल्यावर अष्टप्रधानांच्या उरावर शाहूनें एक मुख्य प्रधान अथवा पेशवा म्हणून अधिकारी नेमिला. येथून पुढें पेशवा मुख्य व अष्टप्रधान गौण असा प्रकार झाला. अष्टप्रधानांतील बरीच मंडळी ताराबाईच्या पक्षाची असल्यामुळें शाहूला ही तोड करावी लागली. येणेंप्रमाणें मराठ्यांच्या राज्यपद्धतींत सरंजामी सरदारीचा नवीन प्रवेश झाला, व तींतून अष्टप्रधानपद्धतीचा हळूं हळूं लोप होत गेला. बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत मराठी राज्यपद्धतीला, वंशपरंपरेनें चालणारी, एक प्रधानघटित मांडलिकसंस्थानोपवर्ति, संयुक्त लष्करी एकसत्तात्मक पद्धति अशी संज्ञा तंतोतंत लागू पडते. सारांश, शाहू, बाळाजी विश्वनाथ ह्यांच्या कारकीर्दीत संयुक्त साम्राज्याचें स्वरूप महाराष्ट्र राज्यपद्धतीला येत चाललें होतें. अथवा खंरे म्हटलें असतां, आलेंच होतें. महाराष्ट्राच्या ह्या संयुक्त साम्राज्याचें रूप एका आधुनिक राष्ट्राच्या संयुत साम्राज्याच्या रूपासारखेच होतें. इंग्लंड व इंग्लडच्या वसाहती ह्यांचा जो संयोग सध्यां बनत चाललेला आपण पाहत आहों तोच संयोग महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेरील सरंजामी सरदारांचीं संस्थानें ह्यांचा त्यावेळी बनत होता. भेद इतकाच की इंग्लंडांत प्रतिनिधिनिक्षिप्त व बहुप्रधानघटित, वंशपरंपरेनें चालणारी एक सत्ता आहे आणि महाराष्ट्रांत त्या वेळीं एकप्रधानघटित अथवा पंतप्रधानघटित वंशपरंपरेनें चालणारी एक सत्ता होती. युनायटेड स्टेट्स, क्यानडा, ट्रान्सव्हाल ह्यांनीं जशी इंग्लंडच्या विरुद्ध आजपर्यंत वेळोवेळी खटपट केली, त्याप्रमाणेंच आंग्रे, दाभाडे वगैरेनीं महाराष्ट्राच्या विरुद्ध केली. वसाहतींतील संस्थानांचें हितसंबंध इंग्लंडच्या हितसंबंधांशीं गोवून टाकण्याचा ब्रिटिश मुत्सद्दी ज्याप्रमाणें सध्यां प्रयत्न करीत आहेत त्याप्रमाणेंच शाहू व बाळाजी विश्वनाथ यांनीं नवीन उत्पन्न झालेल्या सरदारांचे हितसंबंध आपल्या हितसंबंधाशीं गोवून टाकिले. सरदेशमुखी, बाबती, साहोत्रा वगैरे बाबींची वांटणी सरदारांच्या संस्थानांतून व जिंकलेल्या प्रातांतून छत्रपति व सरदार ह्यांच्यामध्यें त्यांनीं अशी करून टाकिली कीं मुख्य सत्तेचा स्पर्श सरदारांच्या सदा अनुभवास यावा व सरदारांच्या हालचाली सदा मुख्य सत्तेच्या देखरेखीखालीं रहाव्या. बाळाजी विश्वनाथाच्या ह्या शिस्तीलाच ग्रांट डफ ब्राह्मणाचा कावा म्हणून दूषण देतो (Duff, chap. xII). कोणतेंहि राष्ट्र संयुक्त संस्थानाच्या पदवीला येऊन पोहोंचलें म्हणजे संयोगांतर्गत संस्थानाचे हितसंबंध मुख्य सत्तेच्या हितसंबंधाशीं गोवून टाकणें अत्यंत आवश्यक कसें होतें ह्याचा अनुभव डफला नसल्यामुळें मुत्सद्देगिरीच्या ह्या धोरणाला तो ब्राह्मणांचा कावा म्हणून दूषण देतो. परंतु संयुक्त साम्राज्याचे ओझें डोक्यावर येऊन पडलेल्या डफच्या नातवांना बाळाजी विश्वनाथाच्या ह्या धोरणाचा अर्थ जास्त उदात्त रीतीनें करतां येईल यांत संशय नाहीं. प्रसिद्ध इतिहासतत्त्ववेत्ते कैलासवासी महादेव गोविंद रानडे यांनीं बाळाजी विश्वनाथाच्या ह्या सरंजामी पद्धतीचे गुणानुवाद मोठ्या भारदस्त शब्दांनीं गायिले आहेत व तें, तत्कालीन वस्तुस्थिति लक्षांत घेतां, सर्वथैव यथायोग्य आहेत. शिवाजीनें रचिलेल्या अष्टप्रधानघटित राज्यपद्धतींचे अनुकरण हिंदुस्थानांत ब्रिटिश मुत्सद्यांनी केलें आहे असें ह्या तत्ववेत्त्याचें म्हणणें होतें. त्याचप्रमाणें मराठ्यांच्या साम्राज्याच्या हितार्थ बाळाजी विश्वनाथानें रचिलेली सरंजामीं राज्यपद्धति, ब्रिटिश साम्राज्याशी वसाहतींतील संस्थानांचे हितसंबंध जखडून टाकण्यास ब्रिटिश मुत्सद्यांनीं योजिलेल्या पद्धतीसारखीच आहे. बाळाजी विश्वनाथाच्या सरंजामी पद्धतींतील कांही कलमें येणेंप्रमाणे होतीं. (१) आपापल्या ताब्यांतील प्रांतांत सरदारांनी मुलकी व लष्करी अधिकार चालवावे. (२) प्रांतांतील उत्पन्नाचे हिशेब सरकारच्या सरदारांना दाखवून सरकारांत रुजू करावे. (३) छत्रपति हुकूम करतील त्या मोहिमेस सरदारांनी जावें. (४) सरकारच्या हुकुमाशिवाय परराष्ट्रांशीं तह किंवा लढाई करूं नये. (५) ठरविलेली पेषकष सरकारांत दरवर्षी भरणा करावी. (६) सरंजामी सरदारी वंशपरंपरा नसून सरकारास वाटेल त्यास देतां यावी. (७) छत्रपतीनीं दिलेले किताब नांवापुढे चालवावे. (८) राज्याच्या बाबी प्रथम वसुलांतून काढून ठेवाव्या. (९) वसुलाच्या बाबी सरदारांनीं देशपरत्वें ठरवाव्या (१०) येणा-या व जाणा-या मालावर जकात बसवावी. ह्या पद्धतींतील हीं दहा कलमे मुख्य आहेत. ह्या पद्धतीअन्वयें, दाभाडे, आंग्रे, बांडे, भोंसले वगैरे सरदाराशीं करारनामे बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत ठरले होते. ह्या कलमांतील कराराच्या विरुद्ध जी जाईल त्याचें पारिपत्य करणें छत्रपतींच्या अधिकारांतील होतें.