प्रस्तावना
२०. ब्रह्मेंद्रस्वामी मराठ्यांच्या राजकारणाचीं मुख्य सूत्रें फिरवीत होता किंवा नाहीं हे पहावयाचें म्हटलें म्हणजे ह्यावेळचें मराठ्यांच्या राजकारणाच्या विस्ताराचें स्वरूप साद्यन्त ध्यानांत आणिलें पाहिजे. त्यावेळच्या मराठ्यांच्या राजकारणाचें रूप दोन प्रकारचें होतें. अंतस्थ व्यवस्था ठेवण्याचें राजकारण करणें हे एक रूप व सर्व भरतखंड हिंदुपदबादशाहींत आणणे हें दुसरें रूप. पैकीं पहिले रूप कालान्तरानें बनत बनत कसें बनलें हें पहाणे मोठें मनोवेधक आहे. शहाजीच्या पूर्ववयांत जी एक लहानशी जहागीर होती, ती शिवाजीनें १६४६ त विजापूरच्या पातशाहींतून फोडून स्वतंत्र संस्थानाच्या पदवीस आणून सोडिली. विजापूरच्या पातशाहींतून स्वतंत्र झालेलें हें मावळांतील शकल वाढत वाढत १६७४ त सह्याद्रीच्या पृष्ठवंशाच्या पूर्वेस व पश्चिमेस बागलणापासून फोंड्यापर्यंत वीस पासून तीस मैलांच्या अंतरानें पसरलें. ह्या प्रसाराला स्वराज्यस्थापन अशी संज्ञा आहे. ह्यावेळीं राजा व अष्टप्रधान हींच काय तीं राज्याची अंगें होतीं. शिवाजीचें महाराष्ट्र त्यावेळीं वंशपरंपरेनें चालणारें व अष्टप्रधानोपदिष्ट असें एकसत्तात्मक राज्य होतें. शिवाजीच्या नंतर २७ वर्षांनीं शाहू राज्यासनीं आल्यावर ह्या एकसत्तात्मक राज्यांत मांडलिक ऊर्फ सरंजामी सरदार उत्पन्न झाले. सरंजामी सरदारांनी आपापल्या प्रांतांतील मुलकी, दिवाणी व लष्करी व्यवस्था पाहून छत्रपतींना पेषकष देऊन रहावें असा निर्बध बाळाजी विश्वनाथाच्या कारकीर्दीत पडला. सरंजामी सरदार उत्पन्न व्हावयाला व शिवाजीच्या स्वराज्याच्या बाहेर मराठ्यांची सत्ता पसरण्याला एकच गांठ पडली. स्वातंत्र्यार्थ लढाईचा निकाल औरंगझेबाच्या मृत्युसमयीं मराठ्यांच्या तर्फेनें लागल्यावर, मराठ्यांच्या शक्तीचा जोर स्वराज्याला पुरून परराज्यात वावरूं लागला. मोंगलांची पिछेहाट झाल्यावर मराठ्यांची पेषामद व्हावी हें पराकाष्ठेची मेहनत करून स्वतंत्र झालेल्या राष्ट्रांचे कुलक्रमागत व्रतच आहे. मोंगलांच्या प्रांतांत मराठ्यांची ही पेषामद मोठी चमत्कारिक झाली. राजाराम महाराज जिंजीस असतांना व राजाराम महाराज मृत्यू पावल्यावर खंडेराव दाभाडे, कंठाजी कदम बांडे, कान्होजी भोसले, चिमणाजी दामोदर, कान्होजी आंग्रे वगैरे सरदार बहुतेक स्वतंत्रपणें मोंगलांच्या प्रांतांत व मोंगलांनी जिंकिलेल्या स्वराज्यांतील प्रांतांत अम्मल चालवीत होते. राज्यावर येण्याच्या समर्यीं व नंतर आपल्या पक्षाला बळकटी यावी या हेतूनें शाहूनें ह्या बहुतेक स्वतंत्र सरदारांना आपल्या राज्याचे बहुतेक स्वतंत्र असे सरंजामी सरदार अथवा मांडलिक केले. मोंगलाच्या प्रांतांत अंमल करणा-या ह्या सरदारांस सरंजाम दिल्यावर स्वराज्यांतील अष्टप्रधान व इतर योद्धे यासहि सरंजाम देणें शाहूस भाग पडलें.