प्रस्तावना
१९ कान्होजी आंग्र्याच्या उदयापासून संभाजी आंग्र्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे सरासरी इसवी सन १६८० पासून १७४२ पर्यंत कोंकणपट्टींतील राजकारणाचा वृत्तांत येथपर्यंत दिला आहे. ग्रांट डफ वगैरे लेखकांनीं ह्या ६२ वर्षांचा इतिहास, व विशेषतः १७२६ पासून १७४२ पर्यंतचा इतिहास इतका अस्पष्ट व भ्रामक रचिला आहे कीं, प्रस्तुत उपलब्ध झालेल्या साधनांचा उपयोग करून घेण्याची सुसंधि ज्यांना सुदैवानें मिळाली आहे त्यांना या लेखकाचें लेख अत्यंत असमाधानकारक वाटतात. आंग्रे, सिद्दी, पेशवे, छत्रपति, इंग्रज व फिरंगी ह्यांच्या हालचालींची सालवार जंत्री प्रथम रचून ती यथावकाश आपल्या इतिहासांत ग्रांट डफनें जर गोंविली असती, तर त्याचें लिहिणे सध्यां जितके टाकावू वाटतें तितकें खचित वाटलें नसतें. सध्यां उपलब्ध झालेला ब्रह्मेंद्रस्वामीचा बहुतेक पत्रव्यवहार ग्रांट डफच्या पहाण्यात यद्यपि आलेला होता, तथापि, तो पत्रव्यवहार तारीखवार लावून त्याची सूक्ष्म छान करण्याची मेहनत त्यानें न घेतल्यामुळें, त्याचें सर्व लिहिणें आधुनिक टीकाकाराच्या आक्षेपास यथान्याय पात्र झालेलें आहे. बहुतेक अस्सल पत्रांवरून नुसता चंद्र आणि वार दिला असल्यामुळे त्यांची नक्की तारीख ठरविणे मुष्कील पडतें, हीं ग्रांट डफची तक्रार आहे. [Duff Chap, XV note.] व हेंच त्याच्या इतिहासाचें मूळ व मुख्य व्यंग आहे. नाणीं, ताम्रपट, शिलालेख ह्यांची छान जितक्या बारकाईने व काळजीने केली जाते, तितक्याच बारकाईने व काळजीनें ऐतिहासिक लेखांचीहि छान होणें अत्यंत आवश्यक आहे. ही छान कशी करावी हें डफला माहीत नसल्यामुळें, त्याच्या हातांत हा पत्रव्यवहार पडून मराठ्यांचा इतिहास जाणूं पाहाणा-या शोधक वाचकांना विशेषशी माहिती मिळण्याचा संभव राहिला नव्हता. अलीकडील दोन वर्षांत, रा. पारसनीसांनीं ब्रह्मेंद्रस्वामीचीं सुमारें ३७५ पत्रें शोधून काढून ही छान करण्याचा सुप्रसंग आणून दिला आहे. रा. पारसनीसांनी ह्या ३७५ पत्रांपैकी ब-याच पत्रांच्या तारखा ठरविल्या नसल्यामुळें, व ज्या कित्येक पत्रांच्या तारखा त्यांनीं आपल्यामतें ठरविल्या आहेत त्यांपैकीं कांहीं चुकल्या असल्यामुळें, त्यांच्या हातून कोंकणातील आंग्रे, सिद्दी वगैरेंच्या हालचालींचा वृत्तांत नीट रीतीने उतरला नाहीं. शिवाय त्यांनीं ह्या पत्रांना ज्या टीपा दिल्या आहेत, त्यांपैकीं ब-याच टीपा ऐतिहासिक माहितीला धरून नाहींत. ह्या तीन अडचणींमुळें रा. पारसनीस यांची मजल ग्रांट डफच्यापुढे फारशी गेली नाहीं. हबशी व आंग्रे ह्यांच्या राजकारणांतील गुंतागुंत आपल्याला नीट उलगडली नाहीं, असे रा. पारसनीस स्वतःच कबूल करतात (चरित्र, पृष्ठ ४५, टीप). आता त्यांना ही गुंतागुंत नीट उलगडली नाहीं इतकेच नव्हें, तर तत्कालीन वस्तुस्थितीचा विपर्यासहि यांच्या हातून सडकून झालेला आहे. हा विपर्यास होण्याला मुख्य कारण रा. पारसनीसांचे पूर्वग्रह होत. (१) मराठ्यांच्या तत्कालीन राजकारणाचा मुख्य चालक ब्रह्मेंद्र होता हा त्याचा पहिला पूर्वग्रह आहे. ह्या मुख्य पूर्वग्रहापासून त्यांनीं आणखी दोन आनुषंगिक पूर्वग्रह काढिले आहेत. ते पूर्वग्रह हेः- (अ) जंजि-याच्या मोहिमेला ब्रह्मेंद्र कारण झाला व (२) वसईच्या मोहिमेलाहि तोच कारण झाला. ब्रह्मेंद्र कारण कसा झाला व ह्या कारणीभवनाचें स्वरूप काय होतें ह्याचा मात्र उलगडा त्यांनीं कोठें केला नाहीं. ‘स्वामींनीं राजकारण सिद्धीस नेण्याकरिता कसकशीं सूत्रें फिरविलीं हें समजण्यास मार्ग नाहीं’ असें त्यांचें स्वतःचेंच मत आहे (चरित्र, पृ. ८६). सारांश, मराठ्यांच्या राजकारणाचीं मुख्य सूत्रें ब्रह्मेंद्रस्वामी फिरवीत होता; परंतु तीं कशीं फिरवीत होता हें सांगतां येत नाहीं, असा सदर लेखकाच्या लिहिण्यांतील मतितार्थ आहे. ह्या मतितार्थात कितपत तात्पर्य आहे ह्या गोष्टीची शहानिशा करणें जरूर आहे.