प्रस्तावना
१८. सावंत, कोल्हापूरकर, आंग्रे, हबशी, फिरंगी व इंग्रज ह्या लोकांनी आजपर्यंत कोंकणांत जो धुडगूस चालविला होता तो १७३९ त पेशव्यांनीं बंद केला. १७३९ त कोंकणांत निव्वळ पेशव्यांचें एकछत्री राज्य सुरू झालें. फिरंग्यांचा तर केवळ नायनाट होऊन गेला. हबशी पेशव्यांचा एक लहानसा मांडलिक बनून राहिला. इंग्रजांनीं मुंबईत राहून उदीम करण्याचें पत्करिलें. येणेंप्रमाणे कोंकणांत सर्वत्र सामसूम झालें. जर कांही कोठें कोकणांत गडबड होण्याचा संभव राहिला असला तर तो संभाजी व मानाजी आंग्रे ह्यांच्या घरांतील तंट्यासंबंधानेंच काय तो रहाण्यासारखा होता. संभाजी आंग्रे सरखेल ह्याच्या मनामध्ये मानाजी आंग्रे वजारतमाब ह्याच्या ताब्यांत असलेला कुलाब्याचा वडिलोपार्जित किल्ला घ्यावयाचा होता. ह्या कामीं ब्रह्मेंद्रस्वामीची वरकरणी सल्ला संभाजीला असावी असा अंदाज आहे (खंड ३, ले. २८४). शाहूमहाराजांचीहि संभाजीला फूस असावी असा संशय घेण्यास कारण आहे (कित्ता). बाजीरावाचें महत्त्व वाढत चाललेलें शाहूराजाला खपेनासें होऊन संभाजीकडून पेशव्यांच्या वतीचा जो मानाजी त्याजवर स्वारी करवावी असा शाहूचा बेत होता. त्याप्रमाणें १७४० च्या जानेवारी-फेब्रुवारींत बाजीराव व चिमाजी अप्पा औरंगाबादप्रांतीं आहेत असा समय पाहून संभाजीनें मानाजीवर चालून घेतलें. (खंड ३, ले २८४ व पा. ब्र. च. ले. ५६). अलीबाग, हिराकोट, थळचाकोट, राजकोट, सागरगड, वगैरे जागा संभाजीनें फत्ते केल्या. ह्या उत्पातांची बातमी लागतांच चिमाजी अप्पा व बाळाजी बाजीराव १७३९ च्या एप्रिलांत पालीवरून कुलाब्यास मानाजीच्या साहाय्यास आले. हिराकोटास तुळाजी आंग्र्या धरला गेला व संभाजी मोठ्या संकटानें समुद्रांतून पळून गेला. मानाजीला साहाय्य केल्याबद्दल पाल व मीरगड हे दोन किल्ले पेशव्यांनी घेतले. संभाजीचा पाडाव करण्याच्या कामीं १७३९ तील तहाप्रमाणें इंग्रजहि मानाजीच्या व पेशव्यांच्या कुमकेस पाण्यांतून आले होते १७४० तील ह्या उत्पातानंतर संभाजीनें १७४२ त मरेतोंपर्यंत फारशी हालचाल केली नाहीं. १७४० च्या नोव्हेंबरांत ब्रह्मेंद्रस्वामीच्या शिफारशीवरून तुळाजी आंग्र्याची बेडी बाळाजी बाजीरावानें काढून टाकिली (पा. ब्र. च. ले. १४० व १५४). तुळाजीची शिफारस स्वामीनें अशा करतां केली कीं संभाजीनंतर मानाजी आंग्र्याला एखादा शह देतां येण्यास आपल्या हातीं साधन असावें. १७४० च्या सप्टेंबरात बाजीरावाशीं व चिमाजी अप्पाशीं स्नेहभावानें वागत जावें असा उपदेश स्वामीनें मानाजीस केला. ह्यावर ही अद्भुत वार्ता आपण कोठून ऐकिली म्हणून मानाजीनें स्वामीस उलट प्रश्न विचारिला. लोकांच्या चित्तांत संशय उत्पन्न कसे करावे, संशय उत्पन्न झाल्यावर ते खरे कसे भासवावे, ही विद्या ब्रह्मेंद्राला उत्तम अवगत होती. मानाजीच्या मनांत भय उत्पन्न केल्यावर, बंधमुक्त तुळाजीलाहि स्वामीनें भेवडविण्याचा प्रयत्न केला. १७४२ त संभाजी वारल्यावर, आपल्याच शापाने तो मेला असे स्वामीनें जगजाहीर केलें (पा. ब्र. च. ले. ३२२). हें जगजाहीर केल्यावर सरखेली पद तुळाजीस करून देण्याचा पत्कर स्वामीनें घेतला. तुळाजीला असें अभिवचन दिल्यावर, मानाजीला सरखेलीचें पद मिळावें असेंहि बोलणें स्वामीनें सकवारबाईजवळ लाविलें. ही बातमी तुळाजीस कळल्यावर त्यानें स्वामीस ह्यासंबंधी पत्र लिहिलें व स्वामीच्या ह्या कृत्रिमपणाबद्दल बहुत खेद दर्शविला (पा. ब्र. च. ले. १००). पुढे तुळाजीला कसेंबसें आपल्या बापाचें सरखेलीचें पद मिळालें. तें मिळाल्याबरोबर तुळाजीला स्वामीनें कर्जाचा तगादा लाविला व शिव्या श्राप देण्यास आरंभ केला. आपला हत्ती नेल्यामुळे कान्होजी मेला; आपल्या आज्ञान ऐकिल्यामुळें सेखोजी आटपला; व आपला अपमान केल्यामुळें संभाजी नरकांत बुडाला, वगैरे मागींल गोष्टींचीं आठवण तुळाजीस देऊन, आपले कर्ज ताबडतोब फेडण्यास तुळाजीस स्वामीनें हुकूम केला (पा. ब्र. च. ले. ३२२). तो हुकूम अमलांत आणण्याइतकें सामर्थ्य तुळाजीच्या अंगी नव्हतें. द्रव्य, वस्तभाव वगैरे सरखेलांकडे कान्होजीच्या वेळीं आपण ठेवीत होतों, ह्याची साक्षहि स्वामीनें आंग्र्यांचा प्रसिद्ध कारकून व मुत्सद्दी रघुनाथ हरि प्रभू यांजकडून पटविली व तुळाजीस अशी भीती घातलीं कीं, आपले कर्ज उगवावयास पेशवे बळकट आहेत (खंड ३, ले ३५५). ह्याच सुमारास स्वामीनें नागोजी आंग्र्यांकडून तुळाजीवर स्वारी करविली (पा. ब्र. च. ले. ७९). ह्या धमकावणीचा परिणाम काय होतो. तें पहाण्यास स्वामी ह्यापुढें फार दिवस वाचला नाही. १७४५ च्या २६ जुलैस दरवर्षाप्रमाणे समाधीस बसला असतां स्वामी एकाएकीं ब्रह्मरूप झाला. निर्वाणसमयीं छत्रपतीकडील कोणी सरदार आपल्याकरितां पालखी घेऊन आला आहे असा स्वामीला भास झाला. स्वामीच्या लौकिकी वृत्तीला हा भास अनुरूपच होता.