प्रस्तावना
१६. वसईच्या वेढ्यांत मराठ्यांचें ५००० माणूस ठार व जाया झालें असे चिमाजी अप्पानें ब्रह्मेंद्रस्वामीस लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. ह्या सर्व वेढ्यांत फिरंग्यांचें ८०० माणूस ठार झालें अशी कित्येकांचीं समजूत आहे व मराठ्याचें ५००० माणूस ठार झालें त्या अर्थी पोर्तुगीज लोकांनीं मराठ्यांची रग चांगलीच जिरविली असें कित्येक लोक समाधान करून घेतातं परंतु हे समाधान केवळ भ्रामक आहे. खरा प्रकार असा होता कीं, शेवटला सुरूंग उडून हल्ला केला. त्या एकाच वेळीं फिरंग्यांचें ८०० माणूस ठार व जखमीं झालें. “पोर्तुगीज लोक शेवटच्या पराभवाचे वेळच्या नुकसानीची गणती देतात.” असें पोर्तुगीज रिपोर्टावरून डफ लिहितो. ६ फेब्रुवारीपासून ५ मे पर्यंत पोर्तुगीजांचे किती लोक ठार झाले ह्याचा कोठें आंकडा पहाण्यांत आला नाहीं. परंतु एका शेवटल्या हल्ल्यांतच जर फिरंग्यांचे ८०० लोक गेले तर सबंध वेढ्यांत व मोहिमेंत किती गेले असतील ह्याचा सामान्य अंदाज होण्यासारखा आहे. प्रो. फॉरेस्ट यांनीं छापिलेल्या पत्रांवरून वसईतील फिरंग्यांची काय दशा झाली होती तें कळण्यासारखें आहे. दुर्दशेनें विपन्न झालेल्या लोकांस अंगावरील शस्त्रासह चिमाजी अप्पानें जाऊं दिलें ह्यावरून फिरंग्यांना व फिरंग्यांचा कड घेऊन बोलणा-यांना फुशारकी मारण्यास कितपत जागा राहते ह्याचा उलगडा स्पष्ट शब्दांनीं करून दाखविला पाहिजे असें नाहीं.
१७. वसई व साष्टी हीं दोन बेटें मराठ्यांच्या ताब्यांत गेलीं हे पाहून, मुंबईतील इंग्रजांचेहि धाबें दणाणून गेलें. द्वेषानें व मत्सरानें वसईच्या वेढ्यांत फिरंग्यांना इंग्रजांनीं योग्य वेळीं साहाय्य केलें नाही, त्यामुळें इंग्रजांच्या ह्या कोत्या वर्तनाला जागा ठेवण्यास पोर्तुगीज सरकारला जागा झाली. वसई घेतल्यावर मुंबईवर गदा येईल ह्या भीतीने त्यावेळच्या मुंबईच्या गव्हर्नरानें चिमाजी अप्पाकडे कप्तान इंचबर्डास नरमाईचें बोलणे करण्यास पाठवून दिलें. व्यापाराच्या सवलतीखेरीज इंग्रजांचें विशेष कांहीं मागणें नसल्यामुळे, चिमाजी अप्पानें कप्तान इचबर्डाचें म्हणणें कबूल केलें. चौल व मरोळ हीं दोन ठाणीं वसई सोडून जातांना फिरंग्यांनीं झंग्रजांना कागदोपत्रीं बहाल करून टाकिलीं व मराठ्यांकडून मिळाल्यास घ्यावी असा आशीर्वादही दिला. परंतु सबंध हत्ती गिळल्यावर ही शेपटें मराठ्यांच्या हातून सुटतील अशी खात्री नसल्यामुळें, इंग्रजांनीं ह्या दोन ठाण्याविषयीं चकार शब्दहि काढिला नाहीं. पुढें कांही दिवसांनीं ही दोन्हीं ठाणीं मराठ्यांच्या हातीं पडलीं. चेऊल शहरच्या स्थितीविषयीं येथे थोडा विस्तार करणें जरूर आहे. चेऊल शहरांत पूर्वी आंग्रे, सिद्दी व फिरंगी अशा तीन लोकांचा अंमल असे. जंजि-याच्या मोहिमेंत सिद्दी याचा चेऊल शहरांतील भाग आंग्रे यांस मिळाला व वसईतील युद्धांत फिरंग्याचाहि भाग मराठ्यांना प्राप्त झाला . येणेंप्रमाणे १७३९ त सबंध चेऊल शहर मराठ्यांच्या हातीं आलें.