प्रस्तावना
१४ इकडे फिरंग्यांना पेशव्यांनीं ह्याप्रमाणें शह दिला असता, तो पेंच काढून टाकण्याच्या इच्छेनें, फिग्यांनीं संभाजी आंग्र्याला मानाजी आंग्र्यावर स्वारी करण्याची भर दिली. १७३४ त संभाजीच्या भयानें मानाजी फिरंग्यांकडे आश्रयार्थ गेला होता. त्या वेळीं कुलाब्यास आपली स्थापना झाल्यास, कांहीं प्रांत आपण तुम्हास देऊं असा करार मानाजीनें आपल्याशीं केला होता असें फिरंग्यांचें म्हणणें पडलें. पुढें १७३५ त मानाजीची स्थापना कुलाब्यास झाल्यावर फिरंगी कराराप्रमाणें मानाजीपाशीं मुलूख मागूं लागलें. तें मागणे मानाजीला विशेष आदरणीय वाटलें नाहीं. तेव्हां फिरंग्यांनीं संभाजीकडून मानाजीवर स्वारी करविण्याचा घाट घातला व तो घाट १७३७ च्या एप्रिलांत अंमलांत आणिला चिमाजी अप्पा साष्टीकडे गुंतल्यामुळें व बाजीराव हिंदुस्थानांत असल्यामुळे, मानाजी एकटा निराश्रित असा सांपडेल व त्याचा सहजासहजी चुराडा करतां येईल अशी अटकळ फिरंग्यांनीं बांधिली होती. कुलाब्यावर स्वारी केली असतां, चिमाजी अप्पाची साष्टीवरील मिठी सैल पडेल असाहि फिरंग्यांचा अंदाज होता. परंतु फिरंग्यांचे हे दोन्ही अंदाज खोटे ठरले. वोडशाच्या स्वारीहून १७३७ च्या एप्रिलांत परत येत असता मानाजीवरील संकटाची व फिरंग्यांच्या प्रतिशहाची बातमी बाजीरावास कळलीं. त्याबरोबर एका क्षणाचाही विलंब न लावतां बाजीराव कोंकणांत उतरला आणि संभाजीला व फिरंग्यांना त्यानें केवळ बाजारबुणग्याप्रमाणें हाकून लाविलें (शकावली, पृ. ७६). ह्या संभाजीच्या मानाजीवरील स्वारीसंबंधीं एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. मानाजीवर स्वारी करण्यास संभाजीला फिरंग्यांचें साहाय्य होतें. परंतु संभाजीच्या मनांत मानाजीवर स्वारी करण्याचा विचार उत्पन्न करण्यास मुख्य कारण ब्रह्मेंद्रस्वामी होता. रा. पारसनीस यांनीं छापिलेल्या पत्रांपैकीं लेखांक ३१४ त संभाजीस स्वामी लिहितो, “तूं जमाव तारवें घेऊन येणें, कुलाबा घेऊं, त्याचा हिसाब काय आहे?” हा उपदेश करून संभाजीस स्वामी कानगोष्ट सांगतो कीं, ह्या गोष्टीसंबंधीं “कोणास ब्र कळों न देणें” एवढीच कानगोष्ट सांगून स्वामी राहिला नाहीं. मानाजीच्या पत्रांचा आपण आदर करीत नाहीं, असेंहि स्यामीनें संभुसिंगाला लिहिले संभुसिंगाला असें प्रोत्साहन दिल्यावर स्वामी मानाजीस ३२८ व्या लेखाकात लिहितो, “संभाजी आंगरे यांच्या मनामध्यें जे आम्हीं कुलाब्यास येऊन तुम्हास श्रापावें, परंतु त्याकडील माणसें व कागद आम्हीं माघारे फिरविले.” स्वामी आपल्याला साहाय्य आहे अशा श्रद्धेने संभाजीनें मानाजीवर स्वारी केली व त्या कामीं त्याची अगदीं नाचक्की झाली नाचक्की झाल्यावर स्वामीनें संभाजीस कोंकणचा स्वतंत्र राजा म्हणून बहुमानानें पत्र पाठविले आहे (खंड ३, लेख २७३). आंग्र्यांच्या कुळाचा नाश करावा, आंग्रे आपलें कर्ज फेडीत नाहींत म्हणून त्यांचा सूड उगवावा, वगैरे खुनस मनांत ठेवून स्वामीनें हे कपटनाटक चालविलें होतें हें उघड आहे.