प्रस्तावना
१३. आंग्रे, हबशी, सावंत, कोल्हापूरकर, झंग्रज व फिरंगी इतक्या मंडळींची कोंकणातील निरनिराळ्या भागांवर सत्ता होती असें पूर्वी सांगितलेंच आहे. पेशव्यांना कोंकणांत एकछत्री राज्य करावयाचें म्हणजे ह्या सहाहि लोकांना संपुष्टांत आणणें जरूर होतें. १७३१ च्या तहांत कोल्हापूरच्या महाराजांना साळशीच्या पलीकडील प्रांत तोडून दिल्यामुळें, उत्तर कोंकणांत ढवळाढवळ करण्याला त्यांना काहीच कारण राहिलें नाहीं. कान्होजी केवळ बहुतेक स्वतंत्र राजा ह्या नात्याने कोंकणांत अंमल चालवीत असे. सेखोजी व संभाजी, संभाजी व मानाजी ह्यांच्यांतील दुहीचा फायदा घेऊन व नवदरें येथील तहांतील कलमांनीं आंग्र्यांची सत्ता दुभंग करून, आंग्र्यांचें स्वातंत्र्य पेशव्यांनीं केवळ नामशेष करून टाकिले जंजिरेकर हबशाशीं बारा वर्षे युद्ध करून व त्यांचे सर्व प्रबल सरदार मारून, सिद्दी अबदुल रहिमान ह्याला पेशव्यांनीं केवळ ताटाखालचें माजर करून सोडिलें वाडीचे सावंत इतके दुर्बल होते की, नुसत्या कागदी दपटशानेंच ते हमेषा ताळ्यावर येत असत येणेंप्रमाणें, आंग्रे, हबशी, सावंत व कोल्हापूरकर ह्या सर्वांची १७३७ पर्यंत कोंकणसंबंधाने यथास्थित व्यवस्था लाविल्यावर इंग्रज व फिरंगी ह्मा दोन परद्वीपस्थ लोकांचा परामर्ष घेण्याचा मराठ्यांनीं प्रयत्न केला. जंजिरेकर हबशाशीं युद्ध सुरूं असतां, इंग्रज व फिरंगी यांनीं शामळाला मदत करून मराठ्यांना बराच त्रास दिला होता. मुंबईच्या क्षुद्र, ओसाड व लोकग्रस्त बेटाखेरीज कोंकणात इंग्रजांची विशेष सत्ता नसल्यामुळें, इंग्रजांहून दिसण्यात तरी विशेष बलिष्ठ अशा फिरंगी लोकांची विचारपूस करणे पेशव्यांना ह्या वेळी अगत्याचें वाटलें. विशेष अगत्य वाटण्यास कारण येणेंप्रमाणे झालें. कल्याण वगैरे स्थलावरून साष्टींत पेशव्यांच्या सैन्याचा उपद्रव न व्हावा म्हणून, १७३६ त वसई येथील फिरंग्यांनीं ठाण्याच्या कोटाची मजबुती आरंभिली. मजबुती करण्यात मुख्य हेतु असा कीं, साष्टी बेटांतील सर्व हिंदु लोक ख्रिस्ती करून टाकावे. ह्या दुष्ट बेताची कुणकुण खंडोजीं माणकर वगैरे साष्टीतील पुढा-यांस कळताच ते चिमाजी अप्पाला १७३६ च्या एप्रिलांत रेवास येथे जाऊन भेटले व साष्टींतील हिंदु लोकांचें संरक्षण करण्यास चिमाजीला त्यांनीं भीड घातली. साष्टावर स्वारी करण्यास ह्या लोकांच्या भीडेचीच जरूर होती असें नाहीं. फिरंगी लोकांनीं हबशाला सहाय्य केलें होते इतकेंच नव्हे, तर आंग्र्यांच्या भांडणांतहि त्यांचे अंग असे. फिरंग्यांचा हा लुब्रेपणा मोडून काढण्याचा पेशव्यांचा पूर्वीपासूनच बेत होता. तशात साष्टीतील लोकांचाहि ह्या कामीं विशेष आग्रह दिसून आलां तेव्हां १७३७ त ठाण्यास अवश्यमेव येण्याचें अभिवचन चिमाजीनें साष्टीकरांस दिलें. पुढें १७३६ च्या पावसाळ्यात बाजीरावाचीहि मुलाखत साष्टीकरानीं घेतली व तेथेहि साष्टीवर मोहीम करण्याचे कायमचें ठरलें. १७३६ च्या हिवाळ्यांत रामचंद्र हरि पटवर्धन यास ठाण्याच्या मोहिमेस पुढे पाठवून, खुद्द चिमाजी अप्पा १७३७ च्या मार्चात कोंकणांत उतरला. रामचंद्र हरि, रामाजी महादेव व खंडोजी माणकर हे ठाण्याजवळ घोणसाळियावर जमा झाले व तेथून त्यांनीं ठाण्यावर तोफांचा मारा केला. ह्या तोफांचा आवाज बदलापुरावरून ऐकून, चिमाजी अप्पा ठाण्यावर रातोरात चालून गेला व दुस-या दिवशीं सकाळीं ठाण्याचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यांत आला. ही हकीकत १७३७ च्या २७ मार्चाला घडली. रामचंद्र हरि, रामाजी महादेव व खंडोजी माणकर ह्यांनी -ठाण्याकडे ही अशी दंगल मांडिली असतां, शंकराजीपंत, गंगाजी नाईक व मोरोजी शिंदे यांणीं खुद्द वसईजवळ पापडी, माणिकपूर व बहादुरपुरा या ठिकाणी फिरंग्यांचा पराभव करून वसईच्या कोटाखालीं गोळीचे टप्प्यावर मोर्चे दिले (साष्टीची बखर, पृ १३, व पा. ब्र. च. ले ४७) “वानरें व वेसावें ह्या स्थळांस फौजा पाठवाव्या म्हणून बुगाजी नाईक मागत होते” मांडवी, तांदुळवाडी, टकमक, वेसावें, काळदुर्ग, मनोहर व बेलापूर, इतकी स्थळें ह्या पहिल्या मोहिमेत सर झालीं. नंतर लौकरच १७३७ च्या जुलैंत चिमाजी अप्पा पर्जन्यकाळानिमित्त पुण्यास गेला.