मूळगांव चेऊल पाखाड्या १६. | |
१. पाखाडी प्रथम | २. पाखाडी अंबेपरी. |
३. पाखाडी मोखवा | ४. पाखाडी इसवी. |
५. पाखाडी दांडे. | ६. पाखाडी वेळावी. |
७. पाखाडी भोरशी. | ८. पाखाडी कुडाळ. |
९. पाखाडी उसवी. | १०. पाखाडी दाखर्वा. |
११. पाखाडी पेठ. | १२. पाखाडी वैजाली. |
१३.पाखाडी झिराळी | १४. पाखाडी कोपरी. |
१५. पाखाडी. | १६. पाखाडी कसबा. |
पातशाही अंमलदार फत्तेखान जाल्यावर हैदरखान याचा अम्मल किल्ले खेडदुर्ग ऊर्फ सागरगड येथें असतां फिरंगी कप्तान सोज पुर्तकाल याणें पातशाहा याजकडे जाऊन फार खुशामत केली; आणि वखारीस जागा गाईच्या एका कातड्याभर मागितली. पातशहानें मेहेरबानी करून चेंऊलच्या सोळा पाखाड्यांपैकीं १ दांडे, २ दाखड, ३ मुरूड एकूण तीन पाखाड्या पालवापासून कारलईच्या खाडीपर्यंत बक्षीस दिल्या. फिरंगी कप्तान सोज याणें किल्ला बांधावयास प्रारंभ केला, शके १४८०. फिरंगी यानें आपली मदत हैदरखान यास देऊन पोवार व पहाणें या उभयतांस लढाई करून जिवें मारिलें, व मराठ्यांचा पराभव केला. फिरंगी व पातशाही एक विचारानें होते. पातशाही अंमल १५४८ पर्यंत होता. १५४८ त मलिकंवर मरण पावला. देशावर मराठे लोकांचा उदय झाला. शिवाजीराजे भोसले यांणी पुंडावे करून मुलूख काबीज केला. शिवाजीराजांनी चेंऊल प्रांतावर अंमल केला. तो प्रांत खेडदुर्ग ऊर्फ सागरगडाला दिला. खेडदुर्ग नांव फिरवून सागरगड असें नांव शिवाजी यांही ठेविलें. सदरहू किल्ल्यावर शिवबंदी ठेवून जमाबंदी करीत असतां फिरंगी अंतोन दिसोझा कप्तान रेवदंडा येथें अंमल करीत होता. फिरंगी व राजा शिवाजी यांची लढाई झाली. जंजिरे राजपुरीकरांशीहीं लढाई होत होती. उभयपक्षीं लढाई होऊन प्रांतास फार उपद्रव होऊं लागला. हें छत्रपति यांही मनांत आणून राजपुरी व रेवदंडा ही दोन्ही ठाणीं काबीज करावी असें मनांत आणिलें, परंतु हस्तगत होतना. याजकरितां शिवबंदी ठेवण्यास दुसऱ्या जागा किल्ले बांधून वसाहत करण्यास आरंभ केला. मुकाम टवस येथें शके १५८० त मनरंजन कोट बांधिला. मुकाम मांडवे येथें श्रीवर्धन शके १५८१ त बांधिला. एकूण दोन किल्ले बांधून, तेथें शिवबंदी ठेवून फिरंगी यांचा वसई येथें जाण्याचा मार्ग बंद करण्याचा यत्न केला; परंतु तो सफळ झाला नाही. फिरंगी फार प्रबळ जाले असें पाहून छत्रपतींनीं चांगलीशी खडकाळ जागा समुद्रामध्यें पाहून तेथें किल्ला बांधावयास आरंभ केला. शके १६०० भाद्रपद मासीं गौरीचे मुळावर सन तिस्सा सबाईन व अलफ या सासी किल्ला बांधून त्यास लढाईचे फार उपयोगी असल्या कारणानें खांदेरी असें नांव ठेविलें. खेसगड, मांडवेगड, खांदेरी व सागरगड या किल्ल्यावर फौज ठेविली. समुद्रामध्यें गलबतें व आरमार ठेवून फिरंगी लोकांबरोबर लढाया केल्या.