[५६८] चेंऊलची बखर.
चेंऊलचें पूर्वींचें नांव चंपावती होतें. त्यांत हंसध्वज नांवाचा क्षत्रिय राजा राज्य करीत होता. क्षत्रिय राजा चेंऊल राज्य करीत असतां चंपावतीचें चेंऊल नांव पडलें. चेऊल राजा राज्य करीत असतां रणजितसिंग नांवाचा रजपूत येऊन त्यानें चेंऊलाचा पराभव केला व आपला अंमल स्थापिला. रणजितसिंगाचा अंमल शालिवाहन शक १००० कालयुक्त नामसंवत्सरपर्यंत होता. त्याचे पुत्र दोन. आवासिंग याचें ठिकाण आवास येथें होतें. शहासिंग याचें ठिकाण सास्वण येथें होतें. ह्यांच्या अमदानींत दिल्लींत यवनांचें राज्य झालें. पुढें रामदेवराव दरणें याणें देवगड येथें रामदरणा नावाचा किल्ला बांधिला. दरणें याचा अंमल २०२ वर्षे चालला. यांच्या पदरीं १ डांगवी, २ बाजी पवार, ३ वीरा पहाणें. डांगवी खेडदुर्ग ऊर्फ सागरगड येथें बाजी पवार, चावरें येथें व वीरा पहाणें भोगनजीक बोरी पाटण येथें किल्ले बांधून होता. हे चार असामी मुलूख लुटून खंडणी घेत असत.दिल्लीच्या पादशहाला हे लोक मानीतनासे झाले. याजकरितां परसू भोंगळा कोळी कोळवण साष्टीकडे होता त्यास खबर पादशहाकडून जाहीर झाली. तेव्हा भोंगळा कोळी याचें चेंऊल प्रांती किहीमचे मैदानांत दरणें याचा पराभव केला. दरणें मारला गेला. भोंगळा यानें रजपूत राजा बिंब यास अंमल सांगितला. बिंब याचा अंमल शालिवाहन शक १२०५ तागाईत १२८० पर्यंत चालला. पुढें बिंब व भोंगळा यांची लढाई होऊन बिंब पाडाव झाला. भोंगळा कोळी याचा अंमल चेंऊल प्रांती शके १२८१ विकारी संवत्सर तागाईत शके १२९० पर्यंत दहा वर्षे होता. कोळी यानें चेंऊल शहरांत प्रळय मांडिला. हिंदूंची देवालयें भ्रष्ट केलीं. प्रजेस फार उपद्रव दिला. नंतर पादशहाकडून फत्तेखान याची रवानगी झाली. भोंगळा कोळी साष्टीस पळून गेला. चेंऊल प्रांताची जमाबंदी देहाय गावें तेपें :-
तेपे अष्टागर, गांव १५. | तेपे ब्राह्मण, गांव २६. |
तेपे मांडले, गांव ४७. | तेपे उमटे, गांव २०. |
तेपे पाल, गांव ४. | तेपे खंडाळें, गांव १९. |
तेपे परहुर, गांव १४. | तेपे झिराड, गांव ८. |
तेपे शिरगांव. | |
एकूण तेपे ९. |